वाजपेयींच्या राजवटीत सर्वाधिक वीजनिर्मिती झाली. अडीच लाख खेडय़ांमध्ये रस्त्यांचे जाळे विणले गेले. साडेचार हजार किलोमीटर रस्त्यांचे चौपदरीकरण झाले. महागाई थांबविण्यात यश मिळवले, असे असताना ‘एनडीए’ च्या काळात काहीच निर्णय झाले नाहीत, अशी टीका शरद पवार करीत आहेत. मात्र, वाजपेयी सरकारला नाव ठेवण्याची पवारांची लायकी नाही, अशा शब्दांत खासदार गोपीनाथ मुंडे यांनी पवारांवर पलटवार केला.
येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार बठकीत मुंडे बोलत होते. माजी आमदार श्रीकांत जोशी, आदिनाथ नवले यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ बडे यांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. पवारांमुळे धान्याची कोठारे सडली. वाटपाअभावी १७ हजार कोटींच्या धान्याची नासाडी झाली. गरिबांचा व शेतकऱ्यांचा कळवळा असणाऱ्या पवारांनी धान्य सडवले; पण गरिबांना वाटले नाही. पवारांमुळेच देशाला महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. शेतकरी हिताच्या होडा कमिटीच्या शिफारशी पवार यांनीच लागू केल्या नाहीत. त्यामुळे पवार शेतकऱ्यांचे मित्र की शत्रू हे लोकांनीच ठरवावे, असा टोलाही मुंडे यांनी लगावला.
महाराष्ट्र भारनियमन मुक्त केल्याचा दावा करणाऱ्या अजित पवारांनी देशाला फसवावे, महाराष्ट्राला फसवावे; पण आपल्या काकांना तरी फसवू नये, असा शेलका सल्लाही मुंडे यांनी दिला. आपल्या खासदारकीच्या काळात जिल्हय़ात किती निधी खर्च केला, याचा हिशेब राष्ट्रवादीकडून मागितला जातो. पाच वर्षांत १९ कोटी खर्च केल्याची माहिती मुंडेंनी यादीसह दाखवली.
‘पंडितांच्या प्रतिष्ठानलाही खासदार निधी’!
राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित प्रचारसभांतून खासदार निधीचा हिशेब मागत काम दाखवा व हजार रुपये मिळवा, असे आवाहन करीत आहेत. त्यावर मुंडे यांनी १९ कोटी निधी खर्च केल्याचे सांगत पंडित यांच्या शारदा प्रतिष्ठानला रुग्णवाहिका व जयभवानी व्यायामशाळेला २० लाख दिल्याचे या वेळी सांगितले. गेवराईत तब्बल एक कोटी निधी दिल्याचेही स्पष्ट केले.

Story img Loader