शिर्डीत मनसेचे मराठीप्रेम जागृत
राज्यात इतरत्र कुठेही अमराठी पाटय़ांचा विषय चर्चेत नसताना  शिर्डीतील मनसे कार्यकर्त्यांना आज अचानक त्याचे स्मरण झाले. बिगरमराठी भाषेत असलेल्या फलकांची मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक मोडतोड सुरू केली. त्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शिर्डी पोलिसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष व शिर्डी शहराध्यक्ष यांच्यासह २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल केला.
शिर्डी हे जागतिक ख्यातीचे तीर्थक्षेत्र असल्याने बहुभाषिक भाविक शिर्डीत येथे येतात. शिर्डीतील अनेक दुकाने, हॉटेल, लॉज यांच्यावर दाक्षिणात्य भाषेतील फलक लावलेले आहेत. त्यास जोड म्हणून हिंदी आणि इंग्रजी भाषेतील नावे टाकलेली आहेत. त्यामुळे अन्य भाषिकांना हे फलक वाचण्यास सुलभ होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज अमराठी फलकांवर अचानक आक्षेप घेतला. मनसेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख विजय काळे व शिर्डीचे शहरप्रमुख दत्तात्रय कोते यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी दुकानांवरील अमराठी भाषिक फलक अचानक तोडण्यास सुरुवात केली. या वेळी मराठी भाषेव्यतिरिक्त दुसऱ्या भाषेचा फलक लावू नये, लावल्यास आंदोलन करण्यात येईल, असे सांगून मनसे कार्यकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणात घोषणाबाजी केली. त्यामुळे काही वेळ गोंधळ होऊन साईभक्तांमध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
फलक तोडफोडीचा प्रकार सुरू असताना पोलिसांनी सुरुवातीला बघ्याची भूमिका घेतली, मात्र प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहताच मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलीस शिपाई शहाजी आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनसेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विजय काळे, शिर्डी शहराध्यक्ष दत्तात्रय कोते, नितीन वाडेकर, संदीप विघे, नाना बावके, दिलीप कुसळकर, विजय मोगले, प्रशांत वाकचौरे, अमोल माळी, राजू कटारे व अन्य ३० कार्यकर्त्यांविरोधात जमावबंदी आदेशाचा भंग करणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, नुकसान करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा