उत्पादन वाढीसाठी सांगलीत प्रकाशयोजनेचा अनोखा प्रयोग

दिगंबर शिंदे, सांगली</strong>

अंधार दूर करून जीवनात प्रकाश फुलवणारा दिव्यांचा उत्सव सर्वत्र सुरू झालाय. पण दिव्यांच्या प्रकाशाचा उपयोग करत त्यावर कुणी फुलांची शेती फुलवली तर? विश्वास बसत नाही ना? पण सांगली जिल्ह्य़ातील एका शेतक ऱ्याने असा प्रयोग करून शेवंतीच्या फुलांची बिगरहंगामी शेती केली आहे. या फुलझाडांना जास्तीतजास्त फुले यावीत, यासाठी त्यांनी शेतात केलेला कृत्रिम प्रकाशयोजनेचा प्रयोग यशस्वी झाला आहे. शेवंतीला बहर आला आहे..उत्पादन वाढले आहे आणि बेलेंच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.

आष्टाजवळच्या सांगली-इस्लामपूर मार्गावरील तुंग येथील शेतकरी जीवन बेले यांनी आपल्या विकास हायटेक नर्सरीमध्ये एक एकरावर बेमोसम शेवंतीची लागवड केली आहे. या बागेत ३०० एलईडी बल्ब लावून ते रात्रीचे रुपांतर दिवसात करीत आहेत. त्यांच्या मते हा एक नवा प्रयोग आहे. पण या प्रयोगामुळे रात्रीचा कोळोख दूर सारून अख्खे रान दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघत आहे.

बेले यांनी संकरित शेवंतीची लागवड केली आहे. ती करण्यासाठी शात्रीय आधार घेतला आहे. सर्वसाधारणपणे मार्च ते मे या तीन महिन्यांत शेवंतीची लागवड केली जाते. लागवडीपासून ९० दिवसांनी शेवंतीला फुले येऊ लागतात. मात्र एकाचवेळी सगळय़ांची फुले बाजारात आल्याने अपेक्षित दर मिळत नाही. शेवंतीचा हा हंगाम आपल्याकडील सूर्यप्रकाशाचे दिवस गृहित धरून आहे. बेले यांनी शेवंतीची प्रकाशाची गरज लक्षात घेऊन आपल्या शेतात कृत्रिम प्रकाशयोजना केली आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे रोपांची वाढ चांगली होऊन कळय़ाही भरपूर आल्या आहेत. प्रकाशाच्या या प्रयोगामुळे शेवंतीच्या उत्पादनात यंदा मोठी वाढ झाली आहे. त्यांचे हे फुलांचे पीक बिगरहंगामी येऊ लागल्याने त्याला चांगला दरही मिळत आहे.

उत्पादन आणि उत्पन्नात वाढ

सर्वसाधारणपणे एका झाडामागे ५०० ते ७०० ग्रॅम कळ्यांचे उत्पादन मिळते, मात्र शेवंतीच्या झाडांना कृत्रिम प्रकाश दिला तर उत्पादन एक किलोपर्यंत वाढते, असे बेले यांनी सांगितले. बिगर हंगामात शेवंती बाजारात गेली तर दरही चांगला मिळतो. सध्या मुंबई, पुणे, बंगळुरू आणि हैद्राबादच्या बाजारपेठेत या शेवंतीला चांगली मागणी आहे. एकरामध्ये ८ ते १० टन उत्पादन निघेल असा अंदाज आहे. सध्या शेवंतीच्या फुलांना सरासरी दर ४० ते ५० रुपये मिळतो, असेही बेले म्हणाले.

शेवंतीला प्रकाशचकवा

झाडा-झुडपांना सूर्यप्रकाश हवा असतो. पण दिवस आणि रात्रीच्या चक्रामुळे त्यांना तो २४ तास मिळत नाही. रात्रीही दिवसाचा आभास करून झाडांना चकवता येते, हे जीवन बेले यांच्या प्रयोगामुळे सिद्ध झाले आहे. त्यांनी आपल्या मळ्यात एलईडी दिवे लावून रात्रीचे रुपांतर दिवसात केले. तिला अखंड प्रकाश मिळाल्याने शेवंती बिगर हंगामात बहरली. नुसती बहरली नाही तर तिने बेलेंच्या पदरात भरभरून फुले दिली. या अनोख्या प्रयोगामुळे संध्याकाळ झाली, की शेवंतीच्या या मळय़ात रोज दीपोत्सव साजरा होतो. तो पाहण्यासाठी अनेक पावले बेलेंच्या मळ्याकडे वळत आहेत.

Story img Loader