एस.टी. महामंडळाच्या चालक, वाहकांनी हव्या त्या ढाबा किंवा हॉटेलवर गाडय़ा थांबवून प्रवाशांच्या वेळेचे रोज नुकसान चालवले आहे. वेळ वाया जाऊ नये म्हणून विना थांबा गाडीचे भरमसाट भाडे देणाऱ्या एस.टी.च्या राज्यभरातील प्रवाशांना प्रवासासाठी यामुळे नेहमीच्या गाडय़ांइतकाच वेळ लागू लागला आहे.
एस.टी. स्थानक वगळून अन्यत्र गाडी थांबवण्याची ही सवलत सुरुवातीला फक्त लांब पल्ल्याच्या गाडय़ांना व तीसुद्धा फक्त एशियाडसारख्या गाडय़ांनाच होती. त्यातही महामंडळ ज्या हॉटेल किंवा ढाब्यावर गाडी थांबणार असेल त्यांच्याकडून वार्षिक शुल्क स्वीकारत असे. त्यानंतरच त्या मार्गावरच्या गाडय़ांना एस.टी. स्थानक वगळून संबधित हॉटेलवर चहापाणी, नाष्टा यासाठी काही वेळ थांबण्याची सवलत मिळत असे. आता मात्र पुणे-औरंगाबाद, पुणे-नगर, नगर, औरंगाबाद अशा फक्त अडीच ते तीन तासांच्या प्रवासातही एस.टी.च्या सर्वच गाडय़ा विशिष्ट हॉटेलवर थांबवण्यात येतात. २० मिनिटांपासून ते थेट ३० मिनिटांपर्यंतही गाडय़ा थांबवण्यात येतात. त्यामुळे प्रवाशांचा वेळ तर वाया जातोच शिवाय खिसाही विनाकारण हलका होतो.
थांबणाऱ्या प्रत्येक गाडीच्या चालक वाहकाला विनाशुल्क चहानाष्टा, तसेच वर प्रत्येकी २५, ५० रुपये हॉटेल किंवा ढाबाचालकांकडून देण्यात येतात अशी चर्चा आहे. हे नुकसान खाद्यपदार्थाचे दर भरमसाट वाढवून भरून काढले जाते. पुणे, नगर गाडय़ा थांबणाऱ्या नगरपासून जवळच्याच एका हॉटेलमध्ये उत्तपा ५० रुपयांना, साधा चहा १० रुपयांना, वडापाव १२ रुपयांना असे दर आहेत. शिवाय पाण्याच्या, शीतपेयांच्या बाटल्या, बिस्किटचे पुडेही जादा दराने विकले जातात. काही हॉटेल व ढाब्यांवर तर आता गावांमधील गुंडांकडून प्रवाशांना लुटण्याचे प्रकारही होऊ लागले आहेत. नगरजवळच्या त्या ढाब्यावरच मध्यंतरी अशी तक्रार झाली होती.  एस.टी. स्थानकातील उपाहारगृहांवर खाद्यपदार्थाच्या दर्जावर तसेच दरावरही एस.टी.चे नियंत्रण असे. तसे कसलेही नियंत्रण या खासगी हॉटेलचालकांवर नाही. काहींनी महामंडळाच्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर संधान बांधून गाडय़ा आपल्या हॉटेलवर थांबतील अशी व्यवस्था करून घेतली आहे. गाडीतील प्रवाशांनी गाडी थांबवण्यास विरोध करू नये यासाठी नगर, पुणे, औरंगाबाद या स्थानकात गाडीचे आरक्षण सुरू असतानाच (विना थांबा गाडीचे तिकीट स्थानकावरच काढावे लागते) संबधित गाडीचा चालक तिथे येऊन ‘गाडी मध्ये थांबणार आहे, बसायचे असेल तर बसा’ असे आधीच बजावतो.
नगर-पुणे किंवा पुणे-नगर प्रवासाला फार झाले तर अडीच तास लागतात. मात्र या प्रकारामुळे गाडी तीन ते सव्वातीन तासांनी पोहोचते. इतक्या कमी वेळासाठी चालक किंवा वाहकाला चहानाष्टय़ाची काहीही गरज नसते, तरीही गाडय़ा थांबवल्याच जातात. गेल्या वर्षभरात प्रवासी भाडय़ाचे दर महामंडळाने कितीतरी वाढवले आहेत. त्यातही विना थांबा गाडी आहे म्हणून जादा पैसे घेतले जातात. व्होल्वोसारख्या गाडय़ांना नेहमीपेक्षा तीनपट जादा दर आहे. प्रवास वेळेत व्हावा यासाठी प्रवासी जास्त पैसे देऊन तिकिटे काढतात, मात्र व्होल्वोसह सर्वच गाडय़ा अशा मध्येच विनाकारण थांबत असल्याने प्रवाशांचे वेळेचे व पर्यायाने पैशाचेही नुकसानच होते. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. कामगार संघटनाही ‘चालक, वाहक विरोधात जायला नकोत’ म्हणून यावर काही बोलत नाहीत. काही चालक, वाहकांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘आमचे पगार पाहा, इतक्या कमी पगारात काम केल्यावर प्रवासात काही ठिकाणी आमच्या खाण्याची विनाशुल्क सोय होत असेल तर त्यामुळे प्रवाशांच्या किंवा आणखी कोणाच्या पोटात दुखायचे काही कारण नाही.’ यामुळे ‘प्रवाशांच्या सोयीसाठी’ असे बोधवाक्य असलेली एस.टी. ‘चालक, वाहकांच्या सोयीसाठी’ झाली असून त्यातून प्रवाशांची मात्र गैरसोयच होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा