त्र्यंबकेश्वर मंदिरात दुसऱ्या धर्माच्या गटाने प्रवेशाची मागणी केल्याने वाद निर्माण झाला होता. या प्रकरणा पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना समज दिली. तसंच या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पुरोहित संघाने केली आहे. तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मात्र याबाबत आता उरुस आयोजक मतीन सय्यद यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हटलं आहे मतीन सय्यद यांनी?
“उरुस पूर्ण गावात निघाला होता. त्यानंतर येताना मंदिराच्या दारावर आम्ही धूप दाखवत असतो. आमची एक श्रद्धा आहे की आम्ही धूप दाखवत असतो. आमची त्र्यंबकेश्वरावर श्रद्धा आहे. संदलमधला एक माणूस धूप दाखवण्यासाठी पुढे जातो. इतकंच असतं. आमच्यापैकी कुणीही मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला नाही. आमच्याविषयी अफवा उठवण्यात आली. उभं राहून फक्त धूप दाखवू द्या असंच म्हटलं होतं. जी अफवा पसरवली जाते आहे त्यामुळे समाजाच चुकीचा संदेश जातो आहे. त्यामुळे हे करणं बंद करावं” असं मतीन यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीशी त्यांनी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
काय आहे हे वादाचं प्रकरण?
त्र्यंबकेश्वर येथे १३ मे रोजी दुसऱ्या धर्माच्या एका गटाकडून यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा मंदिर परिसरात थांबली. देवाला धूप दाखवू द्या, असा आग्रह त्या गटाने धरला. पुरोहितांनी त्याला विरोध दर्शविला. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदूधर्मीयांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्याचा फलक आहे. पुरोहितांच्या विरोधाचे तेच कारण होते. या प्रकरणी पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी काय केलं?
पोलिसांनी रविवारी शांतता समितीची बैठक बोलावत दोन्ही गटांना समज देऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या घटनाक्रमानंतर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुरोहित संघाने संशयितांवर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचेसुद्धा आदेश दिले आहेत.