राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट पसरली असताना अचानक पडणाऱ्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नांदेडच्या बाऱ्हाळी भागामध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलं आहे. तब्बल अडीच हजार हेक्टर क्षेत्रातल्या पिकाला या गारपिटीचा फटका बसला आहे. या भागातल्या हरभरा, गहू, सूर्यफूल, भुईमुगाच्या पिकाचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील हे महसूल मंडळ असून या भागातल्या बापशेटवाडी, मांजरी, सतनूर, हिपळनार, कदनूर, माकणी या गावांमध्ये गारपिट झाली. शुक्रवारी संध्याकाळी ६.३०-७ च्या सुमारास ढगांचा गडगडाट झाल्यानंतर अचानक गारा कोसळू लागल्या. मोठमोठ्या आकाराच्या या गारा कोसळल्यामुळे शेतपिकाचं मोठं नुकसान झालं. करडी, कांदा, ज्वारी, पेरूच्या बागांचंही मोठं नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.