बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रात सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्याच्या बहुतांश भागात पाऊस सुरू असून, कोकण व विदर्भात गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी पश्चिमेला सरकून मध्य प्रदेशचा पूर्व भाग व छत्तीसगडवर सरकले. त्यामुळे बुधवारी राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडलाच, पुढील दोन दिवसही तो कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शिवाय विदर्भ व कोकणातही ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणाला सतर्क राहावे लागणार आहे, असे पुणे वेधशाळेचे अधिकारी एस. बी. गावकर यांनी सांगितले.
राज्याच्या विविध भागात बुधवारी पडलेला पाऊस असा (मिमी)- पुणे २, अहमदनगर १३, नाशिक १२, महाबळेश्वर ३३, सांगली ३, मुंबई कुलाबा १९, सांताक्रुझ ३८, अलिबाग १९, रत्नागिरी २८, भीरा ४९, औरंगाबाद ५, परभणी ४२, बुलढाणा ३, गोंदिया २६, नागपूर ४.
कोकणात संततधार
रत्नागिरी : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी सकाळपासून कोकणात पावसाची संततधार सुरू झाली असून मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवसांच्या उघडिपीनंतर बुधवारी सकाळपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पावसाची संततधार सुरू झाली. गेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्य़ात ५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून खेड (१०५ मिमी) आणि मंडणगड (१०१ मिमी) या दोन तालुक्यांमध्ये त्याचा विशेष जोर राहिला आहे. त्याचप्रमाणे आजअखेर यंदाची एकूण सरासरी २२६९ मिमी झाली. गेला सुमारे दीड महिना पावसाने उत्तम सातत्य राखल्यामुळे सर्वत्र लावणीची कामे येत्या दोन दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
सध्या मासेमारीला अधिकृतपणे बंदी आहे, मात्र, ताज्या मासळीला चांगला भाव मिळत असल्यामुळे जीव धोक्यात घालून काही जण मासेमारी करतात. या पाश्र्वभूमीवर जिल्हा नियंत्रण कक्षातर्फे मच्छिमारांना इशारा देण्यात आला आहे. येत्या २४ तासांत समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५० किलोमीटर असण्याची शक्यता असून उसळणाऱ्या लाटांनी समुद्र खवळलेला राहणार आहे. काही ठिकाणी वादळासह वाऱ्याचा वेग ताशी ६० किलोमीटपर्यंत जाण्याचा धोका आहे, म्हणून मच्छिमारांनी समुद्रावर जाऊ नये, असे जिल्हा नियंत्रण कक्षाने म्हटले आहे.
आजही मुसळधार
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रात सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्याच्या बहुतांश भागात पाऊस सुरू असून, कोकण व विदर्भात गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी पश्चिमेला सरकून मध्य प्रदेशचा पूर्व भाग व छत्तीसगडवर सरकले.
First published on: 18-07-2013 at 05:03 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Normal life disrupted as heavy rains lash maharashtra