महाराष्ट्रापेक्षा तुलनेने कमी प्रगती करणारे ईशान्य भारतातील युवक अवांतर वाचन करण्यात मात्र पुढे आहेत. ‘नॅशनल अॅक्शन प्लॅन फॉर द रिडरशिप डेव्हलपमेंट अमंग द यूथ’ या योजनेअंतर्गत नॅशनल काउन्सिल ऑफ अॅप्लाईड इकॉनॉमी रीसर्च आणि नॅशनल बुक ट्रस्ट यांच्यातर्फे देशातील युवकांमधील वाचनाच्या सवयींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणानुसार देशातील शिक्षित युवकांपैकी २५ टक्के युवक अवांतर वाचन करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील युवकांची या सर्वेक्षणामध्ये पाहणी करण्यात आली होती. या पाहणीसाठी १३ ते ३५ वर्षे वयोगट गृहित धरण्यात आला होता. त्यानुसार देशात ईशान्य भारतातील युवक अवांतर वाचनाबाबतीत आघाडीवर आहेत. तुलनेने आर्थिकदृष्टय़ा समृद्ध असलेल्या महाराष्ट्रापेक्षाही ईशान्य भारतातील युवकांना अवांतर वाचनाची अधिक गोडी आहे. ईशान्य भारतातील ४३ टक्के शिक्षित युवक अवांतर वाचन करतात, तर महाराष्ट्रामध्ये मात्र हे प्रमाण ३५ टक्के आहे. फक्त ईशान्य भारताचा विचार करता तुलनेने अधिक प्रगती करणाऱ्या आसामपेक्षाही इतर राज्यांमधील युवक अधिक प्रमाणात अवांतर वाचन करतात. आसाममध्ये ३९ टक्के, मिझोरममध्ये ६२ टक्के, मणीपूरमध्ये ५२ टक्के आणि नागालँडमध्ये ४७ टक्के युवक अवांतर वाचन करतात.
कादंबरी, कथा अशा (फिक्शन) वर्गामध्ये मोडणाऱ्या साहित्यकृतींना तरुणांची अधिक पसंती आहे. देशभरामध्ये ४२ टक्के युवक फिक्शनला पसंती देतात, तर २४ टक्के युवक नॉन फिक्शन वाचतात. नॉन फिक्शन प्रकारामध्ये धार्मिक पुस्तकांना प्राधान्य दिले जाते. ग्रामीण भागातील युवक धार्मिक विषयांवरील पुस्तकांना अधिक प्राधान्य देत असल्याचे या पाहणीत आढळून आले आहे.
नॉन फिक्शन प्रकारात धार्मिक पुस्तकांखालोखाल व्यक्तिचरित्र अधिक प्रमाणात वाचली जातात. देशातील फक्त ग्रामीण भागाचा विचार केल्यास नागालँड राज्यातील ग्रामीण भागामध्ये अवांतर वाचन करणारे सर्वाधिक युवक आहेत. नागालँडमधील ग्रामीण भागामध्ये ५७ टक्के युवक वाचन करतात. फक्त शहरी भागाचा विचार केल्यास मिझोरममध्ये युवा वाचकांची संख्या जास्त असून ७४ टक्के युवक वाचन करतात.
ईशान्य भारत आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यातील युवक विषय पाहून पुस्तक निवडतात. या सर्वेक्षण करणाऱ्या समितीचे सदस्य आणि पॉप्युलर प्रकाशनचे. रामदास भटकळ यांनी सांगितले, ‘‘हे सर्वेक्षण मोठय़ा प्रमाणावर झाले. परंतु ते संख्यात्मक पातळीवर अधिक झाले, ते गुणात्मक पातळीवर होणेही आवश्यक आहे. किती मुले वाचतात, ते महत्त्वाचे आहेच. पण त्याचबरोबर मुले काय वाचतात, हे पाहणेही आवश्यक आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा