भाऊबीज आणि दिवाळीनिमित्त मिळालेली सुट्टी याची परिणती दोन ते तीन दिवसांत प्रवाशांची संख्या हजारोंनी वाढण्यात झाली आहे. एसटी महामंडळाने जादा बसेसची उपलब्धता केली असली तरी प्रवासी आणि बसेस यांच्या संख्येत ताळमेळ नसल्याने उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश बसस्थानके सध्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. नाशिकसह धुळे, जळगाव शहरातील बस स्थानकांवर जागा पकडण्यासाठी प्रवाशांची तारेवरची कसरत सुरू असून या कारणास्तव खटकेही उडत आहेत.
दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या वाढते. नोकरी-धंद्यानिमित्त शहरात स्थिरावलेले चाकरमानी आपापल्या घरी जाऊन हा सण साजरा करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे दिवाळी सुरू होण्यापूर्वी प्रवाशांची संख्या वाढण्यास तशी सुरुवात झाली होती. लक्ष्मीपूजन झाल्यावर सर्वाना भाऊबीजेचे वेध लागले. आदल्या दिवसांपासून सुरू झालेली ही धावपळ भाऊबीजेच्या दिवशीही पाहावयास मिळाली. राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीनिमित्त लांब पल्ल्यांच्या जादा बसगाडय़ांची व्यवस्था केली आहे. परंतु, प्रवाशांची संख्या इतकी मोठी आहे की, जादा बसेसही अपुऱ्या पडाव्यात. मंगळवारी पहाटेपासून शहरातील महामार्ग बसस्थानक, ठक्कर बाजार आणि मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी प्रवाशांची गर्दी होती. बाहेरगावाहून येणाऱ्या बहुतेक बसेस आधीच ‘हाऊसफुल्ल’ असल्याने त्यात जागा मिळण्याची शक्यता नसते. हे ओळखून नाशिकहून सुटणाऱ्या बसेसवर प्रवाशांची मुख्य भिस्त होती. स्थानकावर बस आल्या आल्या आतमध्ये शिरण्यासाठी एकच चढाओढ सुरू होती. त्यात काहींनी बसच्या मागील भागातून अथवा खिडक्यांद्वारे लहान मुलांना आत पाठवून जागा पकडण्याची क्लुप्ती शोधली. जागेवरून प्रवाशांमध्ये खटके उडत असल्याचे पाहावयास मिळाले. ठक्कर बजार स्थानकावरून पुण्याला गाडय़ा सोडल्या जातात. ‘नाशिक-पुणे’ आणि ‘नाशिक-धुळे’ दरम्यानच्या बस वाहकरहित आहेत. यामुळे प्रवाशांना बस सुटण्यापूर्वीच तिकीट काढावे लागते. ही तिकिटे काढण्यासाठी बरीच मोठी रांग लागली होती.
दिवाळीतील गर्दीची पूर्वकल्पना असल्याने ज्यांनी आगाऊ नोंदणी केली होती, त्यांचा प्रवास काहीसा सुखकर झाला. दिवाळी साजरी करणाऱ्यासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांबरोबर या सुट्टीमुळे पर्यटनासाठी जाणाऱ्यांची काही कमी नव्हती. दिवाळीची सुट्टी म्हणजे अल्प कालावधीच्या पर्यटनाचा योग हे समीकरण गेल्या काही वर्षांत चांगलेच रुजले आहे. या दोन्हींचा ताण एसटी महामंडळावर आला आहे. मध्यम व लांब पल्ल्याच्या सर्वच बसगाडय़ा खच्चून भरून वाहत असल्याने महामंडळाची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होत आहे. नाशिकप्रमाणे मालेगाव, धुळे, जळगाव, नंदुरबार शहरांतील व ग्रामीण भागांतील बसस्थानके प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा