बहुरंगी लढतीमुळे चुरशीच्या ठरलेल्या उत्तर महाराष्ट्रातील ३५ विधानसभा मतदारसंघांत रविवारी मतमोजणी होत असून दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व जागांवरील निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मतपेटीत बंदिस्त झालेल्या एकूण ३९५ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला या माध्यमातून होणार असून वाढीव मतदानाचा लाभ कोणाला होणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे. नाशिक शहरातील चार मतदारसंघ वगळता उर्वरित मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांहून अधिक राहिली. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान नंदुरबार जिल्ह्य़ात ६७.३६, तर सर्वात कमी ६२.८८ टक्के मतदान धुळे जिल्ह्य़ात झाले. नाशिकमध्ये ६४.४३, तर सर्वात कमी जळगाव जिल्ह्य़ात ६३.४८ टक्के मतदान झाले. आठ मतदारसंघांत तर ७० टक्के अथवा त्याहून अधिक मतदानाची नोंद झाली. ६० टक्क्यांहून अधिक मतदान झालेलेही अनेक मतदारसंघ आहेत. वाढीव मतदानामुळे उमेदवार व राजकीय पक्षही चक्रावून गेले आहेत. मागील तीन दिवसांत संबंधितांकडून वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत. नाशिक जिल्ह्य़ात १५ जागांसाठी १७३ उमेदवार, जळगावमध्ये ११ मतदारसंघांत १२९, धुळे जिल्ह्य़ात पाच मतदारसंघांत ५३ आणि नंदुरबारमध्ये चार जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात आहेत. त्यात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, माजी मंत्री व भाजपवासी झालेले डॉ. विजयकुमार गावित, तुरुंगातून निवडणूक लढविणारे माजी मंत्री सुरेश जैन व गुलाबराव देवकर या दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. मतमोजणीची प्रक्रिया सकाळी आठ वाजता सुरू होणार असून त्याची प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय १४ टेबलवर दोन निरीक्षक, साहाय्यक व कर्मचाऱ्यांमार्फत मोजणी केली जाईल. या वेळी सूक्ष्म निरीक्षकांमार्फत नजर ठेवली जाणार आहे. मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असली तरी विधानसभा निवडणुकीचे निकालही दुपारी बारापर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करण्यात आली आहे. आकडेवारीची फेरतपासणी झाल्यावर निकाल जाहीर करण्याआधी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली जाते. ही परवानगी मिळाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील निकाल अधिकृतपणे जाहीर करून विजयी उमेदवारांच्या हाती प्रमाणपत्र सोपविले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
उत्तर महाराष्ट्रातील ३९५ उमेदवारांचा आज निकाल
बहुरंगी लढतीमुळे चुरशीच्या ठरलेल्या उत्तर महाराष्ट्रातील ३५ विधानसभा मतदारसंघांत रविवारी मतमोजणी होत असून दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व जागांवरील निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-10-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: North maharashtra maharesult