उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कवयित्री बहिणाबाई चौधरी नामांतर करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केल्यानंतर खान्देशवासीयांच्या २० वर्षांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. नामांतर लढय़ात भाजप, राष्ट्रवादी या राजकीय पक्षांसह अनेक सामाजिक संस्था, संघटनांचे मोठे योगदान राहिले आहे. राजकीय पटलावर आता त्याचे श्रेय घेण्याची लढाई सुरू होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे विद्यापीठातून विभाजन होऊन १५ ऑगस्ट १९९० रोजी जळगाव, धुळे, नंदुरबारसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली. सुरुवातीला जळगाव आयटीआयमधील एका खोलीत विद्यापीठाचे कामकाज पाहिले जात होते. यानंतर प्रथम कुलगुरू प्रा. डॉ. एन. के. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘उमवि’ची घोडदौड सुरु झाली. शासनाने विद्यापीठाला बांभोरी गावाजवळील खडकाळ डोंगरावर सुमारे ७५० एकर जागा दिली. तत्कालीन कुलगुरूंच्या दुरदृष्टीने विद्यापीठाची रचना करण्यात आली. सुरुवातीला ग्रामीण भागातील विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे उमवि आज शैक्षणिक गुणवत्तेत पुणे, मुंबई विद्यापीठांच्या पंगतीत जाऊन बसले आहे. साधारणत: २० वर्षांपूर्वी उमविला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात यावे, असा विषय पुढे आला. १९९८ मध्ये विद्यार्थी परिषदेचे मनोज चौधरी यांनी मागणी करत तत्कालीन कुलगुरूंना निवेदन दिले. त्याच काळात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांच्यातर्फे नामकरणासाठी प्रस्ताव देण्यात आले. २००३-०४ या शैक्षणिक वर्षांत तत्कालीन अधिसभा सदस्य दिलीप रामू पाटील, विष्णू भंगाळे यांच्यासह काही सदस्यांनी पुढाकार घेतला. नामांतराच्या लढय़ात अभाविपनेही उडी घेतली. त्यांनी संघटनेच्या अधिवेशनात तसा ठराव देखील मंजूर केला. याच काळात उमविला साने गुरुजी यांचे नाव देण्यात यावे यासाठी काही मंडळी सक्रिय झाली होती. विद्यापीठाला नेमके कोणते नाव द्यावे, या विषयावर एकमत होत नसल्याने वादही झाले. २०११ मध्ये राजकीय पक्षांनीही यात सक्रिय सहभाग घेतला. नामकरणाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे बहिणाबाई उद्यान ते विद्यापीठापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. भाजप नेते एकनाथ खडसे यांनीही शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला.

मध्यंतरीच्या काळात हा विषय थंड बस्त्यात पडला. मात्र २०१४ मध्ये पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामकरण झाल्यानंतर उमविच्या नामांतर लढय़ाला वेग आला. नामांतरासाठी अनेक मोर्चे, उपोषण आदी आंदोलने करण्यात आले. मुविकोराज कोल्हे या तरुणाने विद्यापीठाच्या प्रवेशव्दाराजवळ उपोषण केले. उमविला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचा रेटा वाढत असल्याने तत्कालीन कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांच्या कार्यकाळात या विषयावर चर्चा करण्यासाठी नंदुरबार येथील व्यवस्थापन परिषद सदस्या शोभना मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ३० सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. मात्र या समितीची केवळ एकच बैठक झाली. त्यात आलेल्या अर्जामध्ये उमविला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचे सर्वाधिक अर्ज होते. याच काळात राष्ट्रवादीचे तत्कालीन सहयोगी आमदार साहेबराव पाटील यांनी १५ जुलै २०१३ रोजी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ठराव मांडत उमविचे बहिणाबाई चौधरी असे नामकरण करण्याची मागणी केली होती. त्यास एकनाथ खडसे यांनीही पाठिंबा देत या नामांतरासाठी पक्षभेद विसरुन सर्वानी एकत्र येण्याचे आवाहन केले. गेल्या महिन्यात भोरगाव पंचायतीच्या लेवा समाज अधिवेशनात तसा ठराव देखील मंजूर करण्यात आला. त्याआधी खान्देशवासीयांच्या भावना लक्षात घेऊन २०१५ मध्ये विद्यापीठात उत्तर महाराष्ट्र बहिणाबाई चौधरी अध्ययन, संशोधन केंद्राची निर्मिती करण्यात आली. एकनाथ खडसेंनी हा विषय पुन्हा विधिमंडळात उपस्थित केल्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी उमविला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा केली. यामुळे खान्देशवासीयांच्या लढय़ाला यश मिळाले. या निर्णयाचे जळगावमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. आता बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचा रखडलेला विषयदेखील मार्गी लागण्याची आशा पल्लवित झाली आहे.

खान्देशकन्या बहिणाबाई

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मगाव जळगावजवळील आसोदा हे आहे. लग्न झाल्यावर त्या सासरी अर्थात जळगावला आल्या. बहिणाबाई या स्वत: निरक्षर होत्या. मात्र त्यांच्याकडे प्रचंड मोठी प्रतिभाशक्ती होती. घरातील, शेतातील कामे करतांना काव्यात्मक स्वरुपात लेवा गणबोली आणि अहिराणी बोलीभाषेत त्यांनी निसर्गाचे, मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले. त्यांचे पुत्र, प्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी यांनी त्या लिहून ठेवल्या. एकदा आचार्य अत्रे यांना हस्तलिखित कविता दाखविल्यानंतर साध्या-सरळ बोलीभाषेत मांडलेले मानवी जीवनाचे सार समाजापुढे यायलाच हवे, असे अत्रे यांनी सांगितले. नंतर त्यांच्याच पुढाकाराने बहिणाबाई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ५० कविता प्रकाशित झाल्या. अरे संसार संसार, अरे खोप्यामधी खोपा, मन वढाय वढाय.. सारख्या अनेक कविता अभ्यासक्रमात शिकविल्या जातात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: North maharashtra university bahinabai chaudhari