पाऊस आणि गारपिटीमुळे आर्थिक संकट कोसळलेल्या खान्देशातील शेतकऱ्यांच्या मागे सरकार अजूनही उभे राहिले नसल्याचे चित्र दिसत असताना येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सामाजिक बांधीलकीचा प्रत्यय देत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रयोगशाळा ते जमीन या उपक्रमांतर्गत कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन आणि विद्यापीठातील सर्व शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. खान्देशात कुलगुरू प्रा. मेश्राम यांच्या संकल्पनेतून प्रयोगशाळा ते जमीन हा उपक्रम ठिकठिकाणी घेण्यात आला आहे. यामध्ये जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करून कुलगुरू स्वत: जैविक तंत्रज्ञान शेतीविषयक मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांशी त्यांचे एक वेगळेच नातेही निर्माण झाले आहे. अलीकडेच झालेला पाऊस आणि गारपीट यामुळे विद्यापीठ कार्यकक्षेतील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.  या नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. शासनस्तरावर मदतीसाठी हालचाल सुरू झाली असली तरी शेतकऱ्यांच्या हातात ती कधी पडेल, याविषयी साशंकता असल्याने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मदतीसाठी पुढे आले आहे.

Story img Loader