चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन होत नाही, तर फक्त इमारतीचे उद्घाटन होत आहे.
चिपी येथे विमान केव्हा उडेल याचा कोणताही थांगपत्ता नाही. तरीही शिवसेना-भाजपची मंडळी विमानतळाचे उद्घाटन करत असल्याचे सांगून जिल्हावासीयांची फसवणूक करीत आहेत, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी आज केली. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी राणे यांनी पत्रकार परिषद घेतली.
या वेळी सतीश सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, सुदन बांदिवडेकर आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, माझ्या कारकीर्दीत विमानतळाचे काम सुरू झाले. मात्र सत्ताधाऱ्यांना ते अजूनही पूर्ण करता आले नाही.
विमानतळाची अजून बरीच कामे बाकी आहेत. उद्या फक्त टर्मिनल इमारतीचे उद्घाटन होत आहे. प्रत्यक्ष विमान कुठपर्यंत, अजून कसली कसली उद्घाटने करणार, असाही प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द केला याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करीत आहोत. कोकणाला उद्ध्वस्त करणारा नाणार प्रकल्प होता.
हा प्रकल्प रद्द झाल्यामुळे तरुणांना रोजगार तसेच नोकऱ्या कशा मिळतील, असा प्रश्न काही मंडळी उपस्थित करीत आहेत. पण जीवनच सुरक्षित राहणार नसेल तर प्रकल्पात काम कोण करणार, असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला.बेरोजगारांना रोजगार देण्याची सरकारची मानसिकता नाही, अशी टीकादेखील राणे यांनी केली.
आडाळी येथे प्रदूषणविरहित प्रकल्प आणता आले असते, पण तेथे राज्य सरकारला एकही उद्योग आणता आलेला नाही.
आता निवडणुकीच्या तोंडावर उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पालकमंत्री दीपक केसरकर आडाळी येथे उद्योग उभारण्यासाठी गोव्यातील उद्योजकांना आवाहन करत आहेत. वस्तुत: आडाळी येथे एकही कारखाना अगर इमारत उभी राहिलेली नाही, तर मग तेथे उद्योगपती रोजगार देणार कसे, देसाई आणि केसरकर हे रोजगाराच्या मुद्दय़ावर सिंधुदुर्गवासीयांची फसवणूक करीत आहेत. निवडणुकीपूर्वी एकालाही ही मंडळी रोजगार देऊ शकत नाहीत, असेही राणे म्हणाले.