सांगली : मला अजून विधानसभेतच काम करायचे आहे. यामुळे लोकसभेसाठी सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास मी इच्छुक नाही. मात्र, जर पक्षाने आदेश दिला तर पाळावाच लागेल, असे राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ.खाडे म्हणाले, पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडावीच लागते. यामुळे मी पक्षाने आदेश दिला तर सोलापूर लोकसभा निवडणूक लढवू शकतो असे सांगितले. मात्र, मला अजूनही विधानसभेतच काम करायचे आहे. या भागाच्या समस्या सोडविण्यासाठी मी कार्यरत राहीन.

हेही वाचा – पक्षांतरबंदी कायद्यामुळे आमदार लंकेंचा पक्षप्रवेश टळला ?

मिरज आणि जत विधानसभा मतदारसंघावर जनसुराज्य शक्तीचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी हक्क सांगितला आहे, याबाबत विचारले असता ते म्हणाले, महायुतीतील घटक पक्ष म्हणून त्यांनाही जागा मागणीचा हक्क आहेच, पण याबाबत पक्षीय पातळीवरच निर्णय होत असतात. मी हस्तक्षेप करण्याचा प्रश्‍नच येत नाही, असेही मंत्री खाडे यांनी सांगितले.

हेही वाचा – नागरिकांनी हक्कासाठी लढले पाहिजे – राहुल गांधी

विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना पक्षाने सांगली लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षामध्ये काहींनी याबाबत नाराजी व्यक्त केली असली तरी ही नाराजी आता दूर झाली असून खासदार पाटील हे विक्रमी मताधिक्य घेऊन विजयी होतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. उमेदवारीसाठी मागणी करण्यात काहीच चुकीचे नाही. मात्र, पक्षाने एकदा उमेदवारी जाहीर केली की पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकदिलाने प्रचारात कार्यरत राहतात. गत निवडणुकीपेक्षा यावेळी होत असलेली लोकसभेची निवडणूक महायुतीला सोपी असल्याचा दावाही त्यांनी केला.