आशिष देशमुख यांना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बोलणे चांगलेच भोवले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावत निलंबित केले आहे. यानंतर आशिष देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर आता देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना देशमुख यांनी सांगितलं, “मी काँग्रेस पक्षातच आहे. माझे उत्तर शिस्तपालन समितीला पटेल. ते काँग्रेसच्या हिताचे असून, मला पक्षातून काढण्यासंदर्भात कोणतीही कारवाई करणार नाहीत. तसेच, अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” अशी स्पष्टोक्ती देशमुख यांनी दिली आहे.
हेही वाचा : “रावणराज्य चालवणारे अयोध्येला चालले”, आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले…
नाना पटोलेंवर टीकास्र सोडत आशिष देशमुखांनी म्हटले, “नाना पटोलेंनी न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. म्हणून नाना पटोलेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यायला पाहिजे होती.”
“मी सातत्याने काँग्रेस पक्षाच्या हिताचीच भूमिका घेतली आहे. ओबीसी समाज, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या हिताची गोष्ट कोण करत असेल, तर त्याला नोटीस देणे चुकीचे आहे. बजावण्यात आलेल्या नोटीसीला वेळेपूर्वीच शिस्तपालन समितीला उत्तर पाठवण्यात येईल,” असे देशमुखांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : “राखी सावंतची तुलना फक्त अमृता फडणवीसांशी होऊ शकते, कारण…”, सुषमा अंधारेंचा टोला
“काँग्रेस पक्षात षड्यंत्र चालू आहे. ज्याची सुरूवात विधानसभेचे अध्यक्ष असताना नाना पटोले यांनी केली. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता, तेव्हाच संशयाची सुई त्यांच्यावर गेली होती. तेव्हापासून षड्यंत्र सुरु आहे. हे देखील माझ्या उत्तरात दाखल करणार आहे,” असेही आशिष देशमुखांनी सांगितलं.