केंद्रीय अंदाजपत्रकात महाराष्ट्रासाठी ‘अच्छे दिन’चा बिगूल वाजत असला तरी ‘एम्स’ व्यतिरिक्त विदर्भाच्या पदरात फारसे काही पडलेले नाही. देशात चार नवीन ऑल इंडिया इन्स्टिटय़ुट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएमएस) स्थापन करण्यात येणार असून त्यापैकी एक विदर्भात असणार एवढय़ावरच वैदर्भीयांची बोळवण करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्राची भरभराट आणि मराठवाडा व विदर्भात सदैव ठणठणाट नेहमीच दिसून येतो. त्याचेच प्रतिबिंब केंद्रीय अंदाजपत्रकात उमटले आहे. फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ुट ऑफ इंडियाला (एफआयटीटी) राष्ट्रीय संस्थेचा दर्जा, बायोटेक्नॉलॉजी क्लस्टरची स्थापना, राष्ट्रीय औद्योगिक कॅरिडॉरचे मुख्यालय पुण्यात, अशी मुक्तहस्ताने उधळण करण्यात आली आहे. त्या तुलनेत विदर्भाच्या हाती फार काही लागले नाही. सांगोपांग विचार केल्यास महाराष्ट्रासाठी अच्छे दिन वाटणारा हे अंदाजपत्रक विदर्भासाठी निराशाजनकच म्हणावे लागेल.
‘जिओग्राफिकल इंडिकेशन’प्राप्त असलेल्या विदर्भातील संत्रा पिकाबरोबरच धान किंवा सोयाबीन उत्पादक आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगांच्या उभारीसाठी अंदाजपत्रकात दिलासा नाही. विदर्भाचा ३१.६ टक्के भाग जंगलांनी व्यापला आहे. मात्र, जंगल आणि व्याघ्र प्रकल्पांसंदर्भात यात उल्लेख आढळत नाही. केंद्र शासनाने अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिटय़ुट ऑफ एक्सलन्ससाठी आसाम आणि झारखंडची निवड करून त्यासाठी १०० कोटींची तरतूद केली आहे, तसेच आंध्रप्रदेश व राजस्थानातील कृषी विद्यापीठांसाठी आणि तेलंगणा व हरियाणातील उद्यानविद्या विद्यापीठांसाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गाजत असतानाही अशी कोणत्याही संशोधन संस्थेची तरतूद नाही. लिंबूवर्गीय फळांचे संशोधन करणारी राष्ट्रीय संस्था, पर्यावरणाच्या क्षेत्रात संशोधन व विकास करणारी आशियातील आघाडीची ‘नीरी’ ही संस्था विदर्भात असताना या संस्थांच्या कामांना गती देण्याची कळकळ अंदाजपत्रकात दिसत नाही. एकूण १६ आयकर केंद्रांची स्थापना आणि देशभरात १०० ‘स्मार्ट सिटी’ स्थापन करण्याचा उल्लेख अंदाजपत्रकात आहे. यात विदर्भातील कोणत्या जिल्ह्य़ांचा समावेश असेल किंवा नाही, तसेच त्याची अंमलबजावणी कशी करणार, हे स्पष्ट नाही. एकूणच गावापासून शहरापर्यंत सर्वानाच खूष करण्याचा प्रयत्न अंदाजपत्रकात असला तरी विदर्भासाठी वेगळी तरतूद अजिबातच नसल्याने वैदर्भीयांचा केंद्रीय मंत्र्यांनी एकप्रकारे भ्रमनिरासच केला आहे.
‘एम्स’ व्यतिरिक्त विदर्भाची झोळी रिकामी
केंद्रीय अंदाजपत्रकात महाराष्ट्रासाठी ‘अच्छे दिन’चा बिगूल वाजत असला तरी ‘एम्स’ व्यतिरिक्त विदर्भाच्या पदरात फारसे काही पडलेले नाही.

First published on: 11-07-2014 at 05:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nothing but aiims for nagpur in union budget