गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडीची सत्ता जाऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यानंतर, शिवसेनेचे पक्षचिन्ह आणि नाव शिंदे गटाकडे गेले. सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. याचा निकाल केव्हाही येऊ शकतो. त्यातच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज ट्विटरवर सूचक व्यक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातील राजकारणावर संजय राऊत सातत्याने भाष्य करत असतात. आज राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष निवड समितीची वाय. बी. सेंटरमध्ये बैठक होणार असून त्यात शरद पवारांच्या अध्यक्षपदाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याआधीच संजय राऊतांनी सूचक ट्वीट केले आहे. “राजकारणात अपघाताने काहीच घडत नाही. जर असं घडत असेल तर त्यादृष्टीने ती घटना नियोजित केलेली असते, यावर मी पैज लावू शकतो”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा >> शरद पवार राजीनामा मागे घेणार का? आज अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीत होणार निर्णय!

या ट्वीटमध्ये त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही. परंतु, राज्याच्या राजकारणात सध्या घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांचं सूचक ट्वीट चर्चेचा विषय ठरले आहे. म्हणजेच, राजकारणात जे काही होणार आहे ते अपघाताने वा योगायोगाने होणार नसून सर्व घटना पूर्वनियोजित असणार आहेत, हे सूचक वक्तव्य आज होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे. त्यामुळे त्यांच्या ट्वीटमुळे आजच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाची उत्सुकता वाढली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nothing happens by accident in politics sanjay rauts suggestive tweet before the ncp meeting sgk