भंडारदरा धरणातून सोडलेल्या मागील आवर्तनाचा कोणताही फायदा लाभक्षेत्रातील तालुक्यांना झालेला नाही. वंचित क्षेत्राला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पुन्हा आवर्तन सोडण्याची सूचना कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना दिल्या.
भंडारदरा धरणातून मागील आठवडय़ात पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडले होते. मात्र हे पाणी लाभक्षेत्रातील कोणत्याही तालुक्यांना पुरेशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे भंडारदरा धरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पावसाळा लांबल्याने पिण्याच्या लाभक्षेत्रातही पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. पाण्याच्या मागणीसाठी राहाता, श्रीरामपूर, संगमनेर या तालुक्यांतील ग्रामस्थांनी विखे यांची भेट घेऊन नव्याने पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी शुक्रवारी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी, श्रीरामपूरचे उपविगीय अभियंता एस. टी. फरगडे, शाखाधिकारी एन. बी. लोंढे यांच्यासमवेत बैठक घेऊन नवीन आवर्तन धरणातून सोडण्याची सूचना केली. नव्याने आवर्तन उपलब्ध झाल्यास टंचाईसदृश परिस्थितीत पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांना दिलासा मिळेल असे विखे यांनी सांगितले.
विखे यांनी केलेल्या सूचनेच्या पाश्र्वभूमीवर जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांनी आवर्तनाबाबत विचार करून शुक्रवारी दुपारपासूनच निळवंडे धरणात पुन्हा पाणी सोडण्यात आले असल्याचे सांगितले. येत्या १७ ते १८ जुलैपर्यंत पुन्हा आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे सांगून मागील आवर्तनाच्या वेळी निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा संस्थांना आणि गावांना पाणी देता आले नाही, असा खुलासाही कोळी यांनी केला.
उपलब्ध पाणीसाठा व लांबलेला पाऊस याचा विचार करून नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात असे आवाहन विखे यांनी केले आहे.

Story img Loader