३० दगडखाण मालकांना ९० कोटींचा दंड
कराड तालुक्यातील वडगाव हवेली, संजयनगर-शेरे, पाडळी-केसे, सुर्ली, शेणोली, नांदलापूर येथील दगड खाणींमध्ये बेकायदा सुमारे ३ लाख ७२ हजार ७६४ ब्रास डबरचे उत्खनन केल्याप्रकरणी तालुक्यातील ३० दगडखाण मालकांना एकूण ८९ कोटी ४६ लाख ४३ हजार रूपयांच्या दंडाच्या नोटिसा मंगळवारी (दि. १५) तहसीलदार कार्यालयाने बजावल्या असल्याची माहिती प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी दिली.
याबाबतची माहिती अशी, की कराड तालुक्यातील ३० दगडखाण मालकांनी बेकायदेशीरपणे खाणीतून डबरचे उत्खनन केल्याची बाब महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आले. तालुक्यातील नोटीस बजावलेले खाणमालक असे-सह्य़ाद्री स्टोन क्रशर वडगाव हवेली, शिवशंकर बाळासाहेब निकम, संतोष अण्णा नलवडे, विजय कोंडीबा चव्हाण, प्रतीक संपतराव पाटील, तानाजी शंकर वायदंड, धनाजी शंकर पाटील, (सर्व रा. संजयनगर-शेरे), शिवाजी शंकरराव कुरकुटे (रा. शिवडे), रवींद्र सोपानराव जाधव, ललिता बाळासाहेब शिंदे, रमेश नारायण मोहिते, अलका प्रवीण शहा, महेंद्र रघुनाथ पाटील (सर्व पाडळी-केसे), अशोक तुकाराम सावंत (सुर्ली), सतीश सर्जेराव शिंगाडे (शेणोली), राहुल अशोक कांबळे, मुस्ताक मुतवल्ली, कमलाकर सदाशिव कांबळे, अंकुश रामचंद्र जगदाळे, रवींद्र आण्णसाहेब पाटील, मन्सूर सुतार, अमरदीप लाड, मोहन शिंगाडे, आबासाहेब चव्हाण, धनाजी पाटील, प्रमोद पाटील, दिलीप जाधव, भार्गव जाधव व अन्य एक यांनी नांदलापूर येथील दगडखाणीमध्ये उत्खनन केल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व ३० दगडखाण मालकांना दंडाच्या नोटिसा बजावण्यात आल्या. या सर्व खाण मालकांनी तालुक्यातील वेगवेगळय़ा ठिकाणच्या खाणींमधून सुमारे ३ लाख ७२ हजार ७६४ इतक्या डबर ब्रासचे बेकायदेशीर उत्खनन केल्याचे दिसून आले आहे. या सर्व खाण मालकांना आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम सुमारे ८९ कोटी ४६ लाख ३४ हजार रूपयांची होत आहे. कोल्हापूर येथील शासनाच्या भूविज्ञान व खणीकर्म संचालनालयाच्या पथकाने दि. १३ ते १८ सप्टेंबर २०१० या कालावधीत कराड तालुक्यातील वडगाव हवेली, संजयनगर-शेरे, पाडळी-केसे, सुर्ली, शेणोली, नांदलापूर येथील दगडखाणींची मोजणी केली होती. त्यामध्ये अनेक खाणीतून बेकायदा उत्खनन झाल्याचे तपासणीतून निष्पन्न झाले होते. दरम्यान संबंधित खाणमालकांना तहसील कार्यालयाने नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागवला होता. यापैकी केवळ ९ खाणमालकांनी खुलासा दिला होता, पण सदरचा खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांच्यासह उर्वरित सर्व खाणमालकांना दंडात्मक कारवाई करण्याबाबतच्या नोटिसा तहसील कार्यालयाने बजावल्या आहेत. नोटिसा बजावण्याची कार्यवाही नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अव्वल कारकून प्रशांत कदम, एम. व्ही. भंडारे यांनी केली आहे. या सर्व खाण मालकांकडून एवढय़ा मोठय़ा दंडात्मक कारवाईची वसुली झाली तर ती जिल्ह्य़ातील महसूल प्रशासनाने केलेली मोठी कारवाई ठरणार असल्याचे बोलले जात आहे.