पोलीस भरती प्रक्रियेमध्ये पात्र ठरण्यासाठी आवश्यक गुण मिळाले असताना महिला उमेदवारास प्रक्रियेपासून डावलण्यात आले. या महिला उमेदवाराने उच्च न्यायालयात याबाबत धाव घेतली. या प्रकरणाची दखल घेत औरंगाबाद खंडपीठाने पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावली असून, दोन आठवडय़ांत भरती प्रक्रियेचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हय़ात अलीकडेच पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाली. या प्रक्रियेमध्ये अनेक उमेदवार पात्र ठरले. वंजारी समाजाच्या प्रवर्गासाठी १२८ गुणांची मर्यादा होती. या प्रवर्गाअंतर्गत १३३ गुण घेणारे ११ उमेदवार, तर १३५ गुण घेणारे ३ महिला उमेदवारही भरतीसाठी पात्र ठरले होते. खुल्या प्रवर्गातील १३८ गुण घेणारे महिला उमेदवारही पात्र ठरले. अनिता नवनाथ डोईफोडे (कासारी, तालुका केज) ही महिला उमेदवारही भरती प्रक्रियेत सहभागी होती. तिला १३९ गुण मिळाले होते. मात्र, तरीही भरती प्रक्रियेत पात्र ठरण्यापासून तिला डावलले. डोईफोडे या वंजारी असून त्यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज भरला होता. १३८ गुण घेणारी महिला उमेदवार पात्र ठरली असताना १३९ गुण घेऊनही आपल्याला अपात्र का ठरवले? या संदर्भात डोईफोडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत खंडपीठाने पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांना नोटीस बजावली. दोन आठवडय़ांत भरती प्रक्रियेचा अहवाल सादर करण्याचे आदेशित केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा