लोकसभा निवडणूक प्रचार खर्चातील तफावत व इतर त्रुटींबद्दल नगर लोकसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवारांना खुलासा मागवणा-या नोटिसा जारी केल्या आहेत. नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासात स्वयंस्पष्ट खुलासा करण्यास बजावण्यात आले आहे.
निवडणूक कार्यालयास उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चातील सर्वात अधिक तफावत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदावर राजीव राजळे यांच्या खर्चात आढळली आहे. ती ६ लाख ९२ हजार १४९ रुपये आहे. तसेच आम आदमी पार्टीच्या दीपाली सय्यद यांच्या खर्चातही ५७ हजार ८६ रुपयांची तफावत आढळली आहे.
उमेदवारांनी दि. ३ एप्रिलपर्यंत सादर केलेला खर्चाची पडताळणी खर्चविषयक निरीक्षकांनी केल्यानंतर या नोटिसा आता जारी होऊ लागल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी नगरमधील भाजपचे उमेदवार दिलीप गांधी (तफावत ३ लाख ५९ हजार १४० रु.) तर शिर्डी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे (तफावत ३ लाख ३० हजार ६९४ रु.), बहुजन मुक्ती पार्टीचे संतोष रोहम (७ हजार ७४० रु.), आम आदमी पार्टीचे नितीन उदमले (३१ हजार ७०१ रु.), शिवसेनेचे सदाशिव लोखंडे (१८ हजार२३५ रु.) या चौघांना नोटिसा बजावून पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. उमेदवारांनी सादर केलेला खर्च व निवडणूक कार्यालयाने नोंदवलेल्या खर्चातील ही तफावत आहे.
आता गांधी वगळता नगरमधील उर्वरित सर्वच उमेदवारांना खर्चाबद्दल समाधानकारक स्पष्टीकरण करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यात अभिनेत्री दीपाली सय्यद व राजळेंसह बहुजन मुक्ती पार्टीचे अजय बारस्कर (३६ हजार १३० रु.), अपक्ष उमेदवार बी. जी. कोळसे पाटील (४५ हजार १९४ रु.) यांना तफावतीबद्दल खुलासा मागणा-या नोटिसा आहेत. राजळे यांनी प्रतिज्ञापत्रात रोख शिल्लक २ लाख ६० हजार रु. दाखवली होती, मात्र दि. १८ रोजी हिशेब नोंदवहीत ५ लाख शिल्लक दाखवली. २ लाख ४० हजार रुपयांचा स्रोत स्पष्ट करण्यास सांगितले गेले आहे. दीपाली सय्यद यांच्या खर्चातील तफावत दरांतील फरकामुळे आहे. कोळसे यांच्या खर्चाची तफावत त्याच कारणाने झाली आहे.
बसपाचे किसन काकडे, भारतीय नवजीवन सेनेचे शिवाजी डमाळे, महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे पोपट फुले, अपक्ष अनिल धनवट, विकास देशमुख, पेत्रस गवारे, लक्ष्मण सोनाळे व श्रीधर दरेकर यांनाही इतर स्वरूपाच्या त्रुटीबद्दल नोटिसा काढण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा