मोरणा विभागातील पाचगणी (ता. पाटण) येथे भूकंप संशोधन केंद्र कार्यालयाच्या गाडय़ा अडवल्याप्रकरणी पाचगणीचे सरपंच किसन भिवा सुर्वे यांच्यासह चार जणांना पाटणच्या तहसीलदारांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या असून, गैरप्रकार थांबवले नाहीत तर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
याबाबत तहसील कार्यालयाकडून मिळालेली माहिती अशी, की हैदराबाद येथील नॅशनल जिऑलॉजिकल रीसर्च इन्स्टिटय़ूटतर्फे कोयना परिसरात होणाऱ्या भूकंपावर संशोधन सुरू आहे. त्यासाठी कराड तालुक्यातील निगडी व पाटण तालुक्यातील रासाटी व पाचगणी या ठिकाणी भूगर्भात १५०० मीटर बोअर मारून खडकाचे नमुने घेण्याचे काम ६ महिन्यांपासून सुरू आहे. पाचगणी येथे सरकारी सव्र्हे नंबर २५ मध्ये माईनिंग असोसिएट प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून बोअर मारण्यासाठी आणलेल्या वाहनांना किंवा त्या ठिकाणी भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वाहनांना पाचगणीचे सरपंच किसन भिवा सुर्वे, सुरेश गणपत सुर्वे, सीताराम चंद्र सुर्वे व विष्णू धोंडिबा सुर्वे (सर्व रा. पाचगणी ता. पाटण) आडकाठी करीत असल्याबाबत कंपनीने जिल्हाधिकारी सातारा यांना कळविले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाटणचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांना याबाबत आदेश देऊन कारवाई करण्यासाठी सांगितले होते. दोन दिवसांपूर्वी या चौघांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटीस बजावल्या आहेत. आडकाठी करण्याचे थांबविले नाहीतर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, भूकंप संशोधनासाठी आलेली वाहने अडवण्यामागे संबंधितांचा हेतू काय आहे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Story img Loader