नांदेड : नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात १० फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणातील अटक असलेल्या सर्व नऊ आरोपींची नांदेडच्या कारागृहातून अन्य कारागृहात रवानगी होणार आहे. न्यायालयाने याबाबत मंजुरी दिल्याचे सांगण्यात आले. नांदेडच्या मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा तिप्पट कैदी आहेत. २१५ कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात ६१३ कैदी असल्याचे सांगण्यात आले. त्यात अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत.
नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणातील अनेक आरोपी नांदेडच्या कारागृहात आहेत. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी गुरूद्वारा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात एटीएसने ९ आरोपींना ताब्यात घेतले आहे. या सर्व आरोपींना मकोका लावण्यात आला आहे व ते नांदेडच्या कारागृहात आहेत. गोळीबाराच्या घटनेत रवींद्रसिंघ दयालसिंघ राठोड (वय ३०) याचा जागीच मृत्यू झाला होता. तर गुरमितसिंघ सेवालाल हा गंभीर जखमी झाला होता.
या घटनेनंतर पोलिसांनी नांदेडच्या मनप्रीतसिंघ धिल्लो, हरप्रितसिंघ कारपेंटर, दलजितसिंघ संधू, दलजितसिंघ गिल व अर्शददीप संधू या पाच जणांना अटक केली होती तर जगदीश उर्फ जग्गा, शुभदीपसिंघ व पलबिरसिंघ बाजवा या तिघांना पंजाबमधून उचलण्यात आले होते. एटीएसने नऊ आरोपींना अटक केली असून चार आरोपी फरार आहेत. त्यात दोन दिवसांपूर्वी अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पी पसिया याला अटक केली. आणखी तीन आरोपी अद्याप फरार आहेत.
या घटनेत एटीएसने आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोपींचे एकंदरीत कृत्य लक्षात घेता. नांदेड जिल्हा कारागृहातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपींना अन्य कारागृहात हलविण्याची विनंती केली. ती न्यायालयाने मान्य केली आहे. कारागृहाचे पोलीस महासंचालक आता या सर्वांना छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, मुंबई येथील कारागृहात हलवू शकतात. कारागृह अधीक्षकांनी कैद्याच्या क्षमतेचे कारण दर्शविले असले तरीही विनाकारण कोणताही नवा वाद कारागृहात उद्भवू नये यासाठी न्यायालयाला विनंती केल्याचे सांगण्यात आले.
संजय बियाणी हत्या प्रकरणातील आरोपींची सध्या सुनावणी सुरू आहे. सर्व आरोपींना तारखेच्या वेळी न्यायालयात न्यावे लागते. त्यामुळे सध्यातरी त्यांना अन्यत्र हलविणे अशक्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली.