अहिल्यानगरः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज, बुधवारी सायंकाळी अहिल्यानगर शहरातून काढलेल्या मिरवणुकीत राजकीय नेत्यांसह कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोईचाही फलक झळकावला गेला. लॉरेन्स बिश्नोईच्या फलकावर ‘आय ॲम ए हिंदू ए मॅड ए मॅड’ असा उल्लेख करण्यात आला होता. विशेष म्हणजे बिश्नोईच्या फलकामागेच मंत्री नितेश राणे यांची छबी झळकवली गेली होती.
या घटनेने शहरात खळबळ निर्माण झाली आहे. बिश्नोई व मंत्री राणे यांचे फलक झळकवले जात असल्याची चित्रफीतही प्रसारमाध्यमांवर प्रसारित झालेली आहे. शहरात यापूर्वी गणेशोत्सव प्रतिष्ठापनेच्या व विसर्जनाच्या मिरवणुकीत राजकीय नेत्यांच्या छबी असलेले फलक झळकवण्याच्या घटना घडल्या. मात्र आता कुख्यात गुन्हेगाराची छबी असलेले फलकही झळकवले गेले आहे. एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा फलक झळकवला.
आज शिवजयंतीच्या मिरवणुकीत पहेलवान प्रतिष्ठान (माळीवाडा), शिवबा प्रतिष्ठान (मल्हार चौक), साई संघर्ष युवा मंच (वसंत टेकडी), जनता गॅरेज (सावेडी), छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती (नालेगाव) या मंडळांनी सायंकाळी शहरातील जुन्या बस स्थानकाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळून मिरवणुकीस सुरुवात केली. माळीवाडा वेस- पंचपीर चावडी- आशा चित्रपटगृह- माणिक चौक- कापड बाजार- तेलीखुंट- चितळे रस्तामार्गे मिरवणूक दिल्ली दरवाजाबाहेर पडली.
मिरवणूक पंचपीर चावडी भागात असताना कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोईचा फलक झळकावला गेला. मिरवणुकीत पोलीस बंदोबस्त होता. मात्र कोणीही हा फलक झळकावण्यास प्रतिबंध केला नाही. याच मिरवणुकीत नथुराम गोडसे, स्वातंत्र्यवीर सावरकर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र असलेले फलकही झळकवले गेले. दुसऱ्या एका संघटनेने मंत्री नितेश राणे यांचे छायाचित्र असलेला फलक झळकावला. याच फलकाच्या पाठीमागील बाजूस कुख्यात गुन्हेगार लॉरेन बिश्नोईचे छायाचित्र असलेला फलक होता. या फलकावर ‘आय ॲम हिंदू ए मॅड ए मॅड’ असे लिहिलेले होते.
बुधवारी सायंकाळी अहिल्यानगर शहरातून काढलेल्या मिरवणुकीत कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोईचा फलक झळकावला गेला. बिश्नोईच्या फलकामागेच मंत्री नितेश राणेंची छबी झळकवली गेली होती. बिश्नोई व मंत्री राणे यांचे फलक झळकावले जात असल्याची चित्रफीतही प्रसारमाध्यमांवर प्रसारित झालेली आहे. pic.twitter.com/DTuH0e9dKN
— LoksattaLive (@LoksattaLive) February 19, 2025
नथुराम गोडसे यांचे छायाचित्र यापूर्वीच्या शिवजयंतीतही झळकवले गेले होते. परंतु आता कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोईचे छायाचित्र झळकवले गेल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. या मिरवणुकीत मंडळ पुढे नेण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटांना रोखले. मिरवणुकीत भगवे धज घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक शांततेत पार पडली.
यापूर्वी पोलिसांनी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत होणारे वाद लक्षात घेऊन राजकीय नेत्यांचे फलक झळकवण्यास प्रतिबंध केला होता. मात्र तरीही असे फलक झळकवले जात आहेत. आता त्याची लागण शिवजयंतीच्या मिरवणुकीलाही झालेली आहे. या मिरवणुकीतही स्थानिक नेत्यांसह राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची फलक झळकवले जात आहेत. आता तर कुख्यात गुन्हेगाराचाही फलक झळकवला गेला.