शिवसेना(ठाकरे गट) आमदार राजन साळवी यांना एसीबीची नोटीस आल्याने, साळवी यांच्या समर्थनार्थ रत्नागिरीतील लांजा येथील तहसील कार्यालयावर आज एल्गार मोर्चा निघाला होता. यावेळी शिवसेना(ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या कामकाजावर निशाणा साधला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “इथे कायदा सांभाळण्यासाठी, कायद्याचं रक्षण करण्यासाठी जी काही पोलीस यंत्रणा आलेली आहे. त्यांच एलआयबीचे लोक, साध्या गणवेशातील लोक, कॅमेरे घेऊन साध्या गणवेशातील लोक असतील अन्य काहींचे खबरी असतील तर त्यांना हे सांगितलं पाहिजे, की या देशात जेव्हा कायदा तयार झाला त्या कायद्याचं ब्रीद तयार झालं. ‘सद् रक्षणाय खल निग्रहणाय’ अर्थात आम्ही सज्जनाचं रक्षण करू आणि दुर्जनाचा नाश करू. कायदा तयार करताना २५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटनातज्ज्ञांनी एक भाषण घटनासभेसमोर केलं होतं आणि त्यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य उचारलं होतं, की आम्ही या देशाला एक असं संविधान, एक असा कायदा बहाल करत आहोत. ज्या कायद्याने एकवेळ ९९ दोषी सुटले तरी चालतील पण एका नर्दोषाला शिक्षा झाली नाही पाहिजे. पण आता अशी अडचण आहे की, ९९ अपराधी सोडून दिले जातात आणि एका निर्दोषाला मात्र ठरवून कछप्पी लावण्याचा प्रयत्न होतो हे अत्यंत वाईट आहे.”
याचबरोबर, “हे पोलीस यंत्रणेलाही कळायला हवं, की आमचा तुमच्यावर राग नाही. कारण आम्ही समजू शकतो की तुम्ही केवळ हुकुमाचे ताबेदार आहात. तुम्हाला ज्या वरून ऑर्डर येतात, ज्या टीम देवेंद्र कडून ऑर्डर येतात त्या तुम्ही फॉलो करत आहात. परंतु हे कधीतरी तुमच्याही लक्षात यावं की सत्ता बदल असते, हा सत्तेचा पट सतत बदलत राहतो. राजा, वजीर आणि प्यादी काय? खेळ संपल्यावर सगळे एकाच बॉक्समध्ये बंद होतात. याचं भान असलं पाहिजे.” असंही अंधारे म्हणाल्या.
याशिवाय, “महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ९ ऑक्टोबर पासून ठाण्यात टेंभी नाक्यावरून झाली आणि तिथेच माझ्यावर पहिला गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल करण्याचं कारण काय होतं? तर त्यांनी असं सांगितलं की कलम १५३ नुसार तुमच्यावर कारवाई करत आहोत. मला कलम १५३ ची व्याख्या माहीत आहे. जर मी खरंच प्रक्षोभक काही बोलले असेल, माझ्या बोलण्याने दोन जातीत, दोन धर्मात तेढ निर्माण झाली असेल, माझ्या वक्तव्यामुळे कुठेही दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असेल, तर निश्चिपणे तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करू शकता. गुन्हे दाखल करायला हरकत नाही. परंतु मी जर काही प्रश्न विचारते तर माझ्यावर कलम १५३ नुसार गुन्हा कसा काय दाखल करू शकता? हा गुन्हा प्रक्षोभक विधानासाठी दाखल केला जातो.” असं अंधारे यांनी सांगितलं.
“माझ्यावर कलम १५३ नुसार गुन्हा दाखल केला जातो, पण जो हवेत गोळीबार करणारा आमचा चुकार आमदार सदा सरवणकर त्याच्यावर मात्र अजिबात गुन्हा दाखल होत नाही?, जो प्रकश सुर्वे जाहीरपणे सांगतो की, तुम्ही कुणाचेही हात-पाय तोडा मी टेबल जामीन तयार ठेवतो, त्याच्यावर पोलीस अजिबात गुन्हा दाखल करत नाहीत.”असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.