पोंभूर्णा परिसरात धुमाकूळ घालून सहाजणांना ठार करणाऱ्या वाघाची नेमकी ओळख पटविण्यासाठी त्याचे डीएनए बंगळुरू व हैदराबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. डीएनए अहवाल आल्यानंतरच नरभक्षी वाघाची नेमकी ओळख पटणार आहे.
पोंभूर्णा तालुक्यात नरभक्षी वाघाने धुमाकूळ घातला असून तीन महिन्यात सुनीता चित्रपलवार, मोहन ठाकूर, चेकबेरडी, प्रकाश पेंदोर, जुबेदा शेख, वच्छला शेडमाके व पांडुरंग आत्राम या सहा जणांना ठार केले. या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देणारे शार्प शुटर तैनात केले आहेत. तीन पिंजरे व वन विभागाचे पथकसुध्दा तैनात आहे. मात्र, अजूनही या वाघाचा ठावठिकाणा नाही. आता हा वाघ नेमका कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून वन विभागाने या परिसरातील तीन वाघांचे डीएनए बंगळुरू व हैदराबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे. मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात एकूण तीन वाघ आहेत. यातील एक मादी व अन्य दोन नर वाघ आहेत. साधारणत: दोन ते अडीच वष्रे वयाचे हे वाघ पोंभूर्णा परिसरात सातत्याने फिरत आहेत.
कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून या वाघांची छायाचित्रे घेण्यात आली आहे. यातील एक वाघ हा नरभक्षी असल्याचे छायाचित्रांवरून स्पष्ट झाले आहे. सहा पैकी तीन घटनांमध्येच एक वाघ असल्याची नोंद वन खात्यान घेतली आहे. इतर तीन घटनांमध्ये तो वाघ असेलच असे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे हे शोधून काढण्यासाठी म्हणून आता या तिन्ही वाघांचे डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या डिएनए तपासणीचा अहवालच लवकरच उपलब्ध होणार असून त्यानंतरच नरभक्षी वाघ नेमका कोणता हे सांगता येईल असेही ते म्हणाले.
नरभक्षीला ओळखण्यासाठी वाघाची डरकाळी व मुत्राचे नमुनेसुध्दा घेतले जात आहेत. वाघाची डरकाळीचे ध्वनीमुद्रण सुध्दा करण्यात आलेले आहे. तसेच मुत्राचे नमूने घेऊन परिसरातील जंगलात विशिष्ट पध्दतीने वाघाचा शोध घेतला जाणार आहे. दरम्यान, ही वाघ हा पोंभूर्णा तालुक्यात घनोटी, भटाळी, देवई, चेकबेरडी या जंगल परिसरतच फिरत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. वाघाला आकर्षित करण्यासाठी तीन ठिकाणी गुरे बांधण्यात आली आहेत. नेम साधण्यासाठी हालचालींच्या जागी मचाणीही उभ्या केल्या गेल्या आहेत. यातील एकाची वाघाने शिकार केली. गावकरी, वन खात्याचे कर्मचारी, शार्प शुटर व गस्ती पथक वाघाच्या मार्गावर असताना काही केल्या वाघाचा ठावठिकाणा नाही. वाघाला आमिष म्हणून पिंजऱ्यात शिकार लावण्यात आली आहे. आता तर ती सुध्दा अक्षरश: थकून गेली आहे. दरम्यान वाघ याच परिसरात असल्याची लोकांची माहिती आहे. त्यामुळे तो पुन्हा कधीतरी डोके वर काढेल असे गावकरी सांगत आहेत. वन खाते सध्या डीएनए अहवालाची वाघ बघत आहे. नरभक्षी वाघ निश्चित झाला तर त्याला तातडीने जेरबंद करण्यात येईल, असेही मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी सांगितले.

Story img Loader