विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुन्हा अविश्वास प्रस्ताव
विरोधी पक्षांमधील काही सहकारी पक्षांनी दाखवलेल्या अविश्वासामुळे तोंडघशी पडलेल्या शिवसेनेने अविश्वास प्रस्तावाचा नाद सोडल्यानंतर आता भाजपने विरोधकांची विस्कटलेली मोट बांधण्यासाठी पुन्हा एकदा अविश्वास प्रस्तावाचा मुद्दा हाती घेण्याचे ठरविले आहे. शिवसेनेचा प्रस्ताव तांत्रिक मुद्दय़ाने फेटाळला गेला असला तरी पुढील आठवडय़ात पुन्हा सरकार विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिली. मात्र पुन्हा हा प्रस्ताव सभागृहात आल्यास सत्ताधाऱ्यांपेक्षा शिवसेनेलाच फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्याचे स्वप्न साकारण्यासाठी राज्य सरकार विरोधात शिवसेनेने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव विरोधी पक्षांमधीलच अविश्वसाच्या वातावणामुळे बुधवारी बासनात गेला. नियमानुसार हा प्रस्ताव सदनाच्या निदर्शनास आणण्यात आला, त्या वेळी विरोधी पक्षाच्या २९ सदस्यांनी या ठरावास अनुमोदन न दिल्याने तो व्यपगत (लॅप्स) झाला. परिणामी मनसेपाठोपाठ भाजपनेही आपले पत्ते खुले न केल्याने अविश्वासाचा प्रस्ताव सभागृहात चर्चेला आणण्यापूर्वीच शिवेसेनेला पराभव पत्करावा लागला.
 अविश्वास प्रस्ताव आणि सिंचन घोटाळ्याची एसआयटीमार्फतच चौकशी करण्याच्या मुद्दय़ावरून विरोधी पक्षांमधील गटबाजी स्पष्ट झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी, विरोधकांची धार मात्र बोथट होत आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ात सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेण्यासाठी विरोधी पक्षांमधील सर्व घटक पक्षांची मोट पुन्हा बांधण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यानुसार नाराज झालेल्या शिवसेनेला खूश करण्यासाठी पुढील आठवडय़ात पुन्हा एकदा सरकार विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात येणार आहे. शिवसेनेने दाखल केलेला अविश्वासाचा प्रस्ताव तांत्रिक कारणामुळे फेटाळला गेला असला तरी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून पुन्हा एकदा हा प्रस्ताव आणणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. त्या वेळी शिवसेना गटनेते सुभाष देसाई उपस्थित होते. आम्ही विरोधक एकत्रच आहोत असेही खडसे यांनी या वेळी आवर्जून सांगितले. मात्र त्या वेळीही मनसे वेगळीच होती.