महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये भाषण करत असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना २०२४ साठी टार्गेट दिलं आहे. भाजपाने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी १५० चं टार्गेट ठेवा असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये भाजपाच्या नगरसेवकांना उद्देशून भाषण करत होते. नगरसेवकांचेही त्यांनी आपल्या खास शैलीत कान टोचले. त्यानंतर त्यांनी हे मिशन दिलं आहे. त्यामुळे आता नागपूरमध्ये येत्या निवडणुकीत आपलं काय लक्ष्य असणार आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
वाचा सविस्तर- “मी पहाटेच्या शपथविधीची अर्धीच गोष्ट सांगितली आहे”, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “मला…”
काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?
मी गृहमंत्री आहे. मला चांगलंच ठाऊक आहे की कोण काय काम करतं? माझं सगळ्यांकडे व्यवस्थित लक्ष आहे. काँग्रेस पक्ष नेत्यांचा पक्ष झाला आणि त्यानंतर कागदावरचा पक्ष झाला आहे. मला भीती आहे की नागपूरमध्ये भाजपाची हीच अवस्था होणार का? माझं व्यवस्थित सगळ्यांकडे लक्ष आहे. त्यामुळे कुणीही असं समजू नका मी लक्ष देत नाही. जे माजी आहेत त्यांना आजी नगरसेवक व्हायचं आहे. अनेकांचा व्यवहार मालक आहोत असा आहे. हे चालणार नाही. काही जण नेत्यांची माणसं आहेत. आपला स्वतःचा सवतासुभा आहे त्यांना पक्षाशी काही घेणंदेणं काही नाही. असं बिलकुल चालणार नाही हे लक्षात ठेवा असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आपल्या भाषणात नगरसेवकांना त्यांनी झापलं आहे.
नागपूर शहर कार्यकारिणीची बैठक होती. नागपूर पदवीधर मतदारसंघ, अमरावती पदवीधर मतदार संघ या ठिकाणी झालेल्या पराभवानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांना झापलं आहे. येत्या नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपाने १२० जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलं आहे. त्याच अनुषंगाने आज देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवकांचे कान टोचले आहेत.
आणखी काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?
मिशन १५० हे आपलं विधानसभेचं टार्गेट आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं असून त्या अनुषंगाने तयारीला लागा असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र विधानसभेत २८८ जागा आहेत. त्यामुळे १४५ ही मॅजिक फिगर आहे. १४५ आमदार ज्याच्याकडे असतील त्याच्याकडे महाराष्ट्राची सत्ता येईल. हे राजकीय गणित साधण्यासाठीच सज्ज व्हा असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे जे टार्गेट आपल्या भाषणात दिलं आहे त्याची चर्चा सुरू झाली आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा मिळून २०० जागा जिंकणार असल्याची घोषणा सरकार आल्यानंतरच करण्यात आली होती. आता मिशन १५० चं टार्गेट देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिलं आहे.