‘जॅमर’ ही बसविणार
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमला मारण्यासाठी तळोजा कारागृहात पिस्तूल नेण्याची घटना असो अथवा नाशिकरोड कारागृहातून मुंबईच्या एका व्यावसायिकाला कैद्याने खंडणीसाठी भ्रमणध्वनीद्वारे दिलेली धमकी असो, याप्रकारे कारागृह व्यवस्थापनातील अंतरंग उघड झाल्यानंतर गृह विभागाने हातपाय मारण्यास सुरूवात केली आहे. मुंबई व येरवडापाठोपाठ तळोजा, नागपूर व नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहांचे संगणकीकरण आणि सीसी टीव्ही कॅमेरे, भ्रमणध्वनी निष्भ्रम करणारी यंत्रणा (जॅमर) बसविण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन केले जात आहे.
कारागृह व्यवस्थापनात गतिमानता आणणे आणि या कामातील प्रत्येक घटकावर वचक ठेवण्यास संगणकीकरण व सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना हातभार लावणार आहे. उपरोक्त कारागृहात सध्या संगणकाचा वापर अतिशय मर्यादित स्वरूपात केला जातो. संपूर्ण कामकाज आजवर संगणकीकृत झालेले नव्हते. पारंपरिक पद्धतीने काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. म्हणजे, न्यायालयीन प्रक्रियेसाठी एखाद्या कैद्याची सद्यस्थिती हवी असल्यास चांगलीच कसरत होते. त्यातही जुन्या कैद्यांची कर्मचाऱ्यांनी हस्ताक्षरीत नोंद कालांतराने अस्पष्ट होते. मग, त्याची मूळ कागदपत्रे शोधून त्या नोंदीशी पडताळणी करावी लागते. संगणकीकरण प्रक्रियेत उपरोक्त कारागृहातील प्रत्येक कैद्याची माहिती संगणकावर नोंदवली जाईल. शिवाय, पाचही बोटांचे ठसे घेणारी यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. याद्वारे केवळ कैद्याचे नांव टाकल्यास क्षणार्धात सर्व माहिती उपलब्ध होईल, असे कारागृहातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. तळोजा, नागपूर व नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातील संगणकीकरणासाठी सुमारे दीड कोटीच्या निधीस गृह विभागाने मान्यता दिली आहे. मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात हे काम पूर्णत्वास गेले असून पुण्यातील येरवडा कारागृहात ते प्रगतीपथावर आहे. येरवडासाठी सुमारे १२ लाखाच्या निधीची तजविज करण्यात आली आहे. कैद्यांकडून भ्रमणध्वनीचा वापर सर्रासपणे केला जातो. कर्मचाऱ्यांच्या मदतीशिवाय हे अशक्य आहे. अलीकडेच नाशिकरोड कारागृहातील कैद्यांनी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकास खंडणीसाठी भ्रमणध्वनीवरून धमकाविण्याचा प्रकार घडला होता. त्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन कैद्यांना कारागृहातून अटक केली. कैद्यांना हव्या त्या वस्तू कारागृहात सहजपणे पोहोचत्या केल्या जातात. तळोजा कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमवर पिस्तुलातून झालेला गोळीबार, हे त्याचेच एक उदाहरण. राज्यातील बहुतेक कारागृहात हेच चित्र असल्याने कैद्यांबरोबर कारागृह कर्मचाऱ्यांच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची दुसरीही योजना हाती घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत प्रथम मध्यवर्ती कारागृहात ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल, असे संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. तसेच कारागृहातील भ्रमणध्वनीच्या वापरावर पूर्णपणे र्निबध आणण्यासाठी ‘जॅमर’चा पर्याय निवडला जात आहे. भ्रमणध्वनीच्या लहरी निष्भ्रम करणारी यंत्रणा सध्या राज्यातील काही कारागृहात प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आली आहे. साधारणत: महिनाभरानंतर तिच्या उपयोगितेचा आढावा घेऊन कायमस्वरूपी कार्यान्वित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा