शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हस्ते जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज(शनिवार) झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाद्वारे केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील सत्तांतराच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोलाही लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “लोकशाही म्हणजे काय? तुम्ही आम्हाला मतं देऊन निवडून देत असाल, तर तुमच्या मताची किंमत ही खोक्यांमध्ये नाही, तर भावनेमध्ये झाली पाहिजे. आता पंचायत अशी झालेली आहे की आपल्याकडे गुप्त मतदान आहे. गुप्त मतदान जरूर आहे, पण ते गुप्त म्हणजे काय? मी दिलेलं मत माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला कळू नये, असा त्याचा अर्थ आहे. पण आता तुम्ही दिलेलं मत तुम्हाला तरी कळतंय का कुठे जाणार आहे आणि कुठून कुठून जाणार आहे? म्हणजे ट्रॅव्हल एजन्सी सारखं सुरत, गुवाहाटी, गोवा, दिल्ली कधी इकडे कधी तिकडे म्हणजे आम्हालाच माहीत नाही. मतदरांपासून मतदान हे गुप्त व्हायला लागलेलं आहे. असं कसं काय चालणार? ”
याचबरोबर, “ही लोकशाही आपण मानू शकत नाही. लोकशाहीचा अर्थ हा जर का अशा पद्धतीने लागणार असेल, तर मग त्याच्यापेक्षा एकदाच जाहीर करा लोकशाही संपली. जर हिंमत असेल तर जाहीर करा की या देशातली लोकशाही संपली. आम्हाला पाहिजे तेच यापुढे होईल, तुम्ही मत कोणालाही दिलं तरी आम्ही त्याच्या घरी खोका पाठवू, खोक्यात बसवून त्या माणसाला आमच्याकडे आणू तुम्ही बसा बोंबलत.” असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
याशिवाय, “मला असं वाटतं राजकारण हे क्षेत्र वाईट नाही. मी विद्यार्थ्यांना सांगतो की जरूर राजकारणात या. तरूण-तरुणींनी राजकारणात आलंच पाहिजे. कारण तुम्हीच तर उद्याचं भवितव्य आहात. पण ते भविष्य आता वर्तमान जसं अंधकारमय झालेलं आहे तसं होता कामानये. उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्ही पुढे या. राजकारणी आणि साहित्यिक या दोघांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे.” अशी त्यांनी भावना व्यक्त केली.