मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे हे गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आले आहेत. मनोज जरांगेंच्या विरोधात लक्ष्मण हाके यांनीही आंदोलन सुरु केलं होतं. ओबीसींसाठी बैठक घेऊन सरकारने त्यांना आश्वासनं दिली आहेत. ज्यानंतर मनोज जरांगेंचंही आवाहन समोर आलं. त्यात ते म्हणाले की ही बैठक मॅनेज केलेली होती. आता त्यांनी मी एकटा पडलो आहे असं म्हटलं आहे. तसंच समाजाला एक महत्त्वाचं आवाहनही केलं आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
“आरक्षण मिळाल्यानंतर गोरगरीब मराठ्यांची लेकरं मोठी होतील, अधिकारी होतील. ही भीती सगळ्यांनाच वाटते आहे. त्यामुळे मी मराठा आरक्षणाच्या बाजूने उभं राहू नये म्हणून मला घेरण्यात आलं आहे. सत्ताधारी पक्षातले नेते माझ्या बाजूने बोलत नाहीत. मात्र मराठा समाजाने माझ्या बाजूने रहावं, एकजूट ठेवावी ही माझी विनंती आहे.” असं मनोज जरांगे म्हणाले. आज छत्रपती संभाजी नगरमधून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच माझी काळजी करु नका मी बरा आहे. अंगाची आग होते आहे, मात्र मला बरं वाटेल असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- मनोज जरांगेंच्या मागणीनंतर लक्ष्मण हाके आक्रमक, “आरक्षण हा खिरापत वाटण्याचा कार्यक्रम….”
मी एकटा पडलो आहे तेव्हा..
पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगेंनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “मी एकटा पडलो आहे, मराठा समाजातले नेतेही माझ्या बाजूने उभे राहिलेले नाहीत. आरक्षण नसल्याने आपला मराठा जातही संकटात सापडली आहे. ६ जुलै पासून होणाऱ्या मराठा समाजाच्या शांतता जनजागृती रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहा.” असं महत्त्वाचं आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे.
ओबीसी नेत्यांना जातीचं आरक्षण महत्त्वाचं वाटतंय
मराठा समाजाच्या नेत्यांनी फक्त निवडून येण्यापेक्षा किंवा आपल्या पदाची चिंता करण्यापेक्षा जातीचं आरक्षण महत्वाचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ओबीसी समाजातल्या नेत्यांना निवडणुकीपेक्षा आरक्षण महत्त्वाचं वाटतं आहे. त्यामुळेच सांगतो आहे की मराठा जात सध्या संकटात सापडली आहे. ६ ते १३ जुलै या कालावधीत होणाऱ्या जनजागृती रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहा. आपल्या डोळ्यांदेखत लेकरांचं वाटोळं होऊ देऊ नका. ६ जुलै पर्यंत जी काही कामं असतील तर ती उरकून घ्या. मराठ्यांनी घरात न राहता शांतता रॅलीला उपस्थित रहावं असंही आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे. घरात लग्न कार्य असतील तर तिकडेही जाऊ नका. त्यापेक्षा ६ ते १३ जुलै या कालावधीत रॅलींना उपस्थित राहा हे सांगायलाही मनोज जरांगे विसरलेले नाहीत. आता मनोज जरांगेंच्या आवाहनाचा काय परिणाम होणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे.