नागरिकांना कमी कालावधीत पासपोर्ट उपलब्ध होण्यासाठी, पासपोर्टच्या ‘ऑनलाइन अपॉइंटमेंट’चा कालावधी ४५ दिवसांवरून ३० दिवसांचा केला जाणार आहे. याशिवाय पासपोर्टसाठी आवश्यक असणाऱ्या पोलिसांच्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची प्रक्रिया येत्या दोन-तीन महिन्यांत ऑनलाइन केली जाणार असल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुरे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
पासपोर्ट कार्यालयाच्या वतीने शनिवार व रविवार असे दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये, नगर जिल्हय़ातील अर्जधारकांसाठी प्रमथच ‘पासपोर्ट सेवा कॅम्प’ आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पचा फायदा सुमारे २५० जणांनी घेतला. त्यानिमित्ताने त्यांनी ही माहिती दिली. अर्ज केलेल्या नागरिकांना पासपोर्टच्या ज्या कामासाठी पुणे येथे जावे लागत होते, अशी पासपोर्टपूर्वीची, फोटो काढणे, कागदपत्रांची छाननी, फिंगरप्रिंट अशी सर्व प्रक्रिया येथेच पार पाडण्यात आली. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी या कॅम्पला भेट दिली.
पुणे विभागात नगरसह कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा अशा सहा जिल्हय़ांचा समावेश आहे. पासपोर्टची प्रक्रिया वेगाने पार पाडण्यासाठी जिल्हानिहाय मेळावे घेतले जात आहेत. यापूर्वी कोल्हापूर व सोलापूर येथे मेळावे झाले. नगरला प्रथमच कॅम्प झाला. पुण्यातील मुंढवा कार्यालयात दरमहा असे मेळावे घेतले जात आहेत. शिक्षण, पर्यटन आदी कारणांनी परदेशी जाणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. सन २०१३ पेक्षा सन २०१४ मध्ये पासपोर्ट उपलब्ध करण्याच्या प्रमाणात २ लाख १० हजाराने (१६ टक्के) वाढ झाल्याचे गोतसुरे यांनी सांगितले.
पासपोर्टसाठी अर्ज करून शुल्क जमा केल्यानंतर मूळ कागदपत्रे सादर करण्यासाठी तारीख दिली जाते. (ऑनलाइन अपॉइंटमेंट) हा कालावधी ४५ ऐवजी ३० दिवसांचा करण्याचा प्रयत्न आहे. सध्या अर्ज केलेल्यांची चारित्र्य पडताळणी करण्यासाठी पासपोर्ट कार्यालय ते जिल्हा पोलीस मुख्यालय हे काम ऑनलाइन केले जाते, मात्र तेथून स्थानिक पोलीस ठाण्यापर्यंतचे काम टपालाने होते. त्याऐवजी स्थानिक पोलीस ते पासपोर्ट कार्यालय हे काम येत्या दोन-तीन महिन्यांत ऑनलाइन करण्याचे प्रयत्न आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.
पासपोर्ट आता लवकर मिळणार!
याशिवाय पासपोर्टसाठी आवश्यक असणाऱ्या पोलिसांच्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची प्रक्रिया येत्या दोन-तीन महिन्यांत ऑनलाइन केली जाणार असल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुरे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
आणखी वाचा
First published on: 02-03-2015 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now passport will get quickly