संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवाढ प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या १२ उत्तरपत्रिकांखेरीज इतर पत्रिकांमध्येही असे प्रकार झाले आहेत का, याची शहानिशा करण्यासाठी पोलीस यंत्रणेने तब्बल दोन लाख उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम हाती घेतले असून काल पहिल्याच दिवशी पोलिसांनी १४ हजार उत्तरपत्रिका तपासून हातावेगळ्या केल्या आहेत. त्यापैकी १३ उत्तरपत्रिका संशयास्पद आहेत.
दरम्यान, या प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना हवा असलेला आरोपी महेंद्र जानराव दमके याला अटक करण्यात आली असून आतापर्यंत अटक झालेल्यांची संख्या १६ वर पोहचली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गुणवाढ प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सुरुवातीला गुणवाढ प्रकरणात अभियांत्रिकी आणि बीबीएच्या नऊ विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली होती. या परीक्षार्थ्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले.
संबंधित परीक्षार्थ्यांनी १२ उत्तरपत्रिकांमध्ये खोडाखोड करून गुणवाढ केल्याचा प्रकार विद्यापीठ पातळीवर निदर्शनास आला होता. त्यानंतर आणखी चार खोडखोड केलेल्या उत्तरपत्रिका आढळून आल्याचे विद्यापीठाने पोलिसांना कळवले होते. अन्य विषयांमध्ये देखील असे प्रकार झाले असू शकतात, असा संशय पोलिसांना असून त्यादृष्टीने कोणत्या ठिकाणी खोडाखोड झाली आहे का, हे तपासले जात आहे. विद्यापीठाच्या केंद्रीय मूल्यांकन विभागात हिवाळी २०१४ च्या परीक्षेतील ७ लाख उत्तरपत्रिका असून सुमारे २ लाख उत्तरपत्रिका या बी.ई. आणि एम.ई. अभ्यासक्रमाच्या आहेत. पोलिसांनी अभियांत्रिकीच्या संपूर्ण उत्तरपत्रिका तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे. आज सुटी असल्याने हे काम थांबवण्यात आले असले, तरी येत्या काही दिवसात हे काम पूर्ण केले जाणार आहे.
तपासणीदरम्यान १३ उत्तरपत्रिका संशयास्पद आढळल्या आहेत. ज्या विद्यापीठाच्या समितीकडे पाठवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यांच्याकडून तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. दुसरीकडे, अटक करण्यात आलेल्या महेंद्र दमके याच्याकडून पोलिसांना आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.
दमके हा २०११ ते २०१३ या कालावधीत विद्यापीठात कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला होता. गुणवाढ प्रकरणात त्याचा सहभाग असल्याची कबुली या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या परीक्षार्थ्यांनी दिली आहे. पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे आणि फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.सी. खंडेराव यांच्या मार्गदर्शनात सुमारे ५५ पोलिसांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम हाती घेतले होते. परीक्षा नियंत्रक डॉ. जयंत वडते यांच्यासह विद्यापीठातील अधिकारीदेखील त्यांना मदत करीत आहेत.

Story img Loader