राज्याच्या निरनिराळ्या भागातील हवामान व भौगोलिक रचनेचे वैविध्य लक्षात घेऊन यापुढील काळात प्रादेशिक पातळीवरील कृषी धोरण आखण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले आहे.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ३२ वा पदवीदान समारंभ विखे-पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. धारवाड कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम. महादेवप्पा याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना विखे-पाटील म्हणाले की, सध्या संपूर्ण राज्यासाठी एकच कृषी धोरण आखून राबवले जाते.
पण राज्याचा विस्तार, प्रदेशानुसार बदलते हवामान आणि भौगोलिक रचना त्यामध्ये विचार घेतला जात नाही. त्यामुळे या धोरणाचा संपूर्ण राज्यभर समान प्रमाणात लाभ होत नाही. ही विसंगती लक्षात घेऊन यापुढे प्रादेशिक पातळीवरील कृषी धोरण आखण्याचा आणि त्यानुसार अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या त्या भागात शेतीवर होणाऱ्या हवामानाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समित्या नेमण्यात आल्या असून त्यांचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे.
राज्याचा कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांच्या कामगिरीबाबत असमाधान व्यक्त करून कृषिमंत्री म्हणाले की, विद्यापीठांचा विस्तार शिक्षण विभाग अजूनही चार भिंतींच्या आतच काम करत आहे. या विभागाचा शेतकऱ्याला किती फायदा होतो, याबद्दल शंका आहे. चारही कृषी विद्यापीठांमध्ये रिक्त पदांचे प्रमाणही जास्त असून त्याबाबतच्या भरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एकाच मंडळाद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.  दरम्यान, विद्यापीठातर्फे आयोजित पदवीदान समारंभात मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे डॉ. महादेवप्पा यांनी देशातील कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांपर्यंत वेगाने माहिती पोहोचवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
 विश्वासार्ह माहिती, संवाद प्रणाली, आपत्कालीन व्यवस्थापन तंत्रज्ञान आणि स्रोतांची उपलब्धता ही काळाची गरज आहे, असे सांगून कृषी क्षेत्रात विविध आयामी विकास साधणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांनी स्वागतपर भाषणात विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेताना येथील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यापीठाने २७ गावे दत्तक घेतली असल्याची माहिती दिली. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विजय कोलते, जिल्हाधिकारी राजीव जाधव, कुलसचिव प्रवीण पुरी, संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, अधिष्ठाता डॉ. विजय जोशी इत्यादी मान्यवर समारंभाला उपस्थित होते.