”राज्यातील ४३ सहकारी साखर कारखान्यांच्या खरेदी विक्रीची चौकशी व्हावी अशी मागणी सातत्याने लावून धरली आहे. आता ईडी करून साखर कारखान्यांवर केली गेलेली कारवाई मात्र राजकीय हेतूने प्रेरित आहे.”, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केला आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, ”ईडीची कारवाई ही राजकीयदृष्ट्या प्रेरित झालेली कारवाई आहे, असं मला दिसत आहे. कारवाई ही १०० टक्के झाली पाहिजे, ही अनेक वर्षांपासून आम्ही मागणी करत आहोत, रस्त्यावर आंदोलन करत आहोत. न्यायालयात दाद मागितली. मी स्वत: राज्यातील जे ४३ सहकारी साखर कारखाने विकले गेलेले आहेत. ते कवडीमोल किंमतीने विकले गेलेले आहेत. याला ८९ लोक जबाबदार आहेत, यांच्या विरोधात मी मुंबई उच्च न्यायालयात पाच वर्षांपूर्वी याचिका दाखल केलेली आहे. दुर्दैवाने ती बोर्डावर आलेली नाही. न्यायालयाने केवळ एवढच सांगितलं, एफआयआर दाखल करावी, पोलीस कारवाई झाल्यानंतर मग न्यायालयाकडे या आणि पोलिसांनी कारवाई सुरू केली नाही. मी ईडीच्या दारात हेलपाटे घातले. आयकर विभागाच्या दारात हेलापाटे मारले. सेबीकडे गेलो, मनी लॉड्रिंगचा मुद्दा उपस्थित केला. कारण, एवढे पैसे आले कुठून कारखाने विकत घ्यायला, हा खरा प्रश्न होता.”

तसेच, ”राज्यातील ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका बंद पडल्यात आहेत, त्यामध्ये अनेकांच्या ठेवी बुडाल्या आहेत. अनेकांचे पैसे बुडाले. राज्य सहकारी बँकावर आजही प्रशासक आहे. महाराष्ट्रातील जनतेचा हा पैसा आहे. या ४३ सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारने कर्जाला हमी दिलेली होती. ते राज्य सरकारचे पैसे बुडाले. हा सगळा एक व्यापक असा मोठा घोटाळा आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या पैशावर टाकलेला हा दरोडा आहे. याची सखोल चौकशी झाली आहे, या मताशी मी आजही ठाम आहे. ती चौकशी झाली पाहिजे परंतु, ईडी आज ज्या पुराव्याच्या आधारे चौकशी करत आहेत. ते पुरावे मी पाच वर्षांपूर्वीच त्यांच्याकडे सादर केले होते.” असंही राजू शेट्टींनी म्हटलं आहे.

हे सुद्धा तपासाचं नाटक होणार –

”या साखर कारखान्याचा खरेदी व्यवहारात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते आहेत. एकही पक्ष यापासून अलिप्त नाही, या सगळ्या नेत्यांनी मिळून हा दरोडा टाकलेला आहे. परंतु ईडी हा दिल्लीकरांना सोय होईल अशी, दिल्लीकरांना जे त्रासदायक ठरतात, त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी अशाप्रकारे तपासाचं नाटक करतं, मला माहिती हे सुद्धा तपासाचं नाटक होणार आहे. दिल्लीमध्ये खलबतं झाली बैठक झाली की तपास शांत होणार आहे. ” असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

Story img Loader