“आता अनिल परबचा ही नंबर लागणार. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकाम साठी आलेला पैसा याची चौकशी होणार. भारत सरकारने दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे, ३० मार्च रोजी सुनावणी होणार.” असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते व राज्याचे परिहवनमंत्री अनिल परब यांनी सूचक इशारा दिला आहे.
माध्यमांशी बोलताना भाजपा नेते किरीट सोमय्या म्हणाले, “आता पुढचा नंबर अनिल परबचा. याचबरोबर यशवंत जाधव संबंधात जी आयकर विभागाच्या पाहणीत खूप माहिती बाहेर आली. ३४ ठेकेदरांची सखोल माहिती महापालिकेकडून आयकर विभाने मागवली आहे. तीन अधिकाऱ्यांची नावं आलेली आहेत, त्याचा अभ्यास सुरू आहे आणि या तपासात ईडी आणि कंपनी मंत्रालयाने देखील रस दाखवला आहे. माझ्या माहितीप्रमाणे पुढील आठवड्यात कंपनी मंत्रालयाकडून देखील चौकशीचे आदेश निघणार. ईडीने देखील आपला अभ्यास सुरू केला आहे, म्हणजेच अनिल परब आणि यशवंत जाधव या स्पर्धेत कोण पुढे निघतोय, त्याची वाट पाहावी लागणार.”
घोटाळेबाजांना उघड करणं हा जर गुन्हा असेल तर तो मी एक हजार वेळा करणार –
तसेच, “घोटाळेबाजांना उघड करणं हा जर किरीट सोमय्याचा गुन्हा असेल तर तो मी एक हजार वेळा करणार. किरीट सोमय्याने जर राजकीय बळाचा दुरुपयोग केला असेल, तर माझ्याविरुद्ध कारवाई करा, असं मी अगोदरच म्हणालेलो आहे.” असं किरीट सोमय्या यांनी यावेळी बोलून दाखवलं.
संजय राऊत आणि सुजीत पाटकर कोविड हॉस्पिटल घोटाळ्याच्या चौकशीला देखील गती मिळणार –
याचबरोबर, “माझ्यादृष्टीने जे आणखी चार घोटाळे मी उघडकीस आणले आहेत, त्याचा पाठपुरावा सातत्याने सुरू असतो. दर आठवड्याला एक दोन दिवस दिल्लीला देखील जावं लागतं. यामध्ये हसन मुश्रीफ संबंधी पाठपुरावा सुरू आहे, लातूरचे एक मंत्री आहेत त्यांच्या संबंधी देखील पाठपुरावा सुरू आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात ज्या मुंबई उच्च न्यायालयात याचिका आहेत, आम्ही न्यायालयास विनंती करणार आहोत की त्याची लवकर सुनावणी व्हावी. त्याव्यतिरिक्त अनिल परब आणि यशवंत जाधव हे दोघे तर आहेतच आणि या सगळ्यांचे प्रवक्ते संजय राऊत आणि सुजीत पाटकर कोविड हॉस्पिटल घोटाळ्याच्या चौकशीला देखील आता गती मिळणार आहे.” असं देखील किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अडचण समजू शकतो –
तर, “नवाब मलिकांचा राजीनामा अजुनही घेतला गेलेला नाही, राजीनामा घेणार नाही अशी सरकारची भूमिका आहे. यावर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अडचण समजू शकतो कारण, १६ नेत्यांचे घोटाळे सिद्ध झालेले आहेत. तर मग जर सगळ्यांचेच जर राजीनामे घ्यायला लागले, तर सरकारच अदृश्य होणार. मी समजू शकतो.”