राज्यातील मध्यवर्ती कारागृहातील विविध गुन्ह्य़ात शिक्षा भोगत असलेल्या सर्व कैद्यांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवनज्योत विमा काढण्यात येणार असून विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील मध्यवर्ती कारागृहात केली. याप्रसंगी निवडक कैद्यांना या योजनेचे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
मध्यवर्ती कारागृहात जागतिक योग दिनानिमित्त ऑर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते प्रामुख्याने सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी कैद्यांसोबत योगासनांमध्ये भाग घेतला. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर देशमुख, अतिरिक्त महासंचालक (कारागृह) मीरा बोरवणकर, उपमहानिरीक्षक (कारागृह पूर्व) स्वाती साठे, अधीक्षक योगेश देसाई उपस्थित होते. यानंतर ते म्हणाले, राज्यातील कारागृहातील सर्व कैद्यांचे पंतप्रधान जनधन योजनेच्या माध्यमातून खाते उघडण्यात येईल. मध्यवर्ती कारागृहात केलेल्या कामाची रक्कम या खात्यात जमा करावी. त्याचप्रमाणे प्रत्येक कैद्याचा विमा काढण्यात येईल.
कैदी तुरुंगात असेपर्यंत त्याच्या खात्यात राज्य सरकार रक्कम जमा करेल. या रकमेचा भविष्यात त्यांना लाभ होऊ शकतो. जीवनात संघर्ष हा असतोच. मनातील असूया, द्वेष, मत्सर, हे सर्व अज्ञानाची प्रतीके आहेत. मात्र, योग हा अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा मार्ग आहे.
प्रत्येकाने या मार्गाचा अवलंब करून जीवन सुसह्य़ करावे. योग ही भारतीय संस्कृती आहे. ती आज जगभर पोहोचली असून योग केल्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य उत्तम राहते, तसेच नैतिकताही संवर्धित होते. हा योग दिन आयुष्यातील दैनंदिनी झाली पाहिजे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.  यावेळी अभिनेते प्रशांत दामले यांनी ७३ कैद्यांना योगाचे महत्त्व पटवून सांगितले. योगामुळे वाईट विचार थांबवता येतात. त्यातून मग बुद्धी काम करते आणि चांगले विचार अनुसरण्याचे ज्ञान मिळते, असे सांगून ‘सांगा कसे जगायचे क ण्हत कण्हत की गाणे म्हणत’ आता तुम्हीच ठरवा, या गीताने भाषणाचा समारोप केला. दस्तुरखुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने कैद्यांमध्ये उत्सुकता होती.
मुख्यमंत्र्यांसमोर कैद्यांनी विविध आसने शिस्तबद्ध पद्धतीने करून दाखवून त्यांनी वाहवा मिळवली. योग दिनानिमित्त राज्यातील ५० कारागृह आणि ९ मध्यवर्ती कारागृहात आंतरराष्ट्रीय योगदिनासाठी गेल्या दीड महिन्यांपासून  योग प्रशिक्षण सुरू होते, अशी माहिती स्वाती साठे यांनी प्रास्ताविकातून दिली. संचालन आर.एस. चांदणे यांनी, तर स्वाती साठे यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा