वर्षानुवर्षे दरवर्षी गणपतीसाठी अनेकजण कोकणात जातात. मागच्यावर्षी कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे अनेकांना कोकणात जात आलं न्हवतं. बाकी कोणत्या सणाला तरी गावी जाणं झालं नाही तरी गणेशोत्सवासाठी आवर्जून कोकणात जातात. त्यामुळे दरवर्षी कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी करण्याकरिता, भारतीय रेल्वेने आता गणपती स्पेशल ट्रेनच्या एकूण १५० फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वप्रथम ७२ त्यानंतर आणखी ४० फेऱ्या आणि आता ३८ फेऱ्या वाढविण्यात येत आहेत असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज जाहीर केले आहे.
अशा आहेत रेल्वेच्या फेऱ्या
गणपति उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेच्या आता एकून १५० फेऱ्या होणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेने आधीच जाहीर केले आहे अश्या ७२ फेऱ्या आहेत. त्यानंतर मध्य रेल्वेने जाहीर केलेली अतिरिक्त ट्रेनच्या ४० फेऱ्या आणि सध्य परिस्थिती पाहून पश्चिम रेल्वेने आत्ता ३८ फेऱ्या भारतीय रेल्वेच्या जाहीर केल्या आहेत. अश्या एकून १५० गणपती स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. याचे नोटिफिकेशन देखील काढण्यात आले आहे. कोकणामध्ये जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची काळजी केंद्र सरकार घेईल.
गरज लागण्यास सोय केली जाणार
“कोणालाही गणपती उत्सव साजरा करायला कोकणात जायला अडचण आम्ही येऊ देणार नाही. तसेच, मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये ज्या काही अडी-अडचणी असतील, त्यांचे प्रश्न आम्ही सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत”असे मंत्री दानवे यांनी सांगितले. या पुढे देखील वेटींग लिस्ट वाढली तर आणखी सोय करण्यात येईल. कुठल्या ही प्रवाश्यांना त्रास होऊ देणार नाही, असेही दानवे म्हणाले.