छत्रपती शिवाजीमहाराजांच्या या महाराष्ट्राला मागील १५ वर्षांत काँग्रेसच्या हाताने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडय़ाळाने लुटले आहे. देशात बदल केला तसा आता राज्यातही करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण व मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी जिल्हय़ात केले.
भाजपचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे (नेवासे) व आमदार राम शिंदे (कर्जत-जामखेड) यांच्या प्रचारासाठी अनुक्रमे सोनई व मिरजगाव येथे झालेल्या सभांमध्ये इराणी बोलत होत्या. नेवासे येथील सभेस भाजपचे तालुकाध्यक्ष दिनकर गर्जे, अनिल ताके, जानकीराम डौले, नितीन दिनकर व मिरजगाव येथील सभेस खासदार दिलीप गांधी, नामदेव राऊत, अशोक खेडकर, राजेंद्र देशमुख, नानासाहेब निकत, प्रसाद ढोकरीकर आदी उपिस्थत होते.
सोनई येथे इराणी म्हणाल्या, नेवासे मतदारसंघातील रावणाची लंका जळाली, तेथे सोनई कुठे राहिली, तेथील दादागिरीला खपवून घेतले जाणार नाही, मतदार गुंडगिरीविरुद्ध भूमिका घेतील असा इशारा अभिनेत्री व केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी दिला. जिजाऊंचा जयजयकार करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात खाकी वर्दीतील महिला पोलीसही सुरक्षित नाहीत. अशा या सरकारला हद्दपार करत कमळ फुलविण्याचे आवाहन त्यांनी केले.
इराणी यांनी महिला सुरक्षेच्या प्रश्नावर आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप केला. महिला पोलीस कर्मचारीही येथे सुरक्षित नसून गुन्हेगारी प्रवृत्तींवर सरकारचा जरब नसल्याचे इराणी म्हणाल्या. शेतकऱ्यांवरील गोळीबार, कर्जबाजारीपणाला आघाडीचे धोरण कारणीभूत आहे. मुरकुटे यांच्यावर सोनई येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध करत दडपशाहीला झुगारून भाजपला साथ देण्याचे आवाहन केले. ज्ञानेश्वरीचा दाखला देत त्यांनी केलेल्या आघाडी सरकारवरील टीकेला उपस्थितांनी दाद दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा