लोकसत्ता प्रतिनिधी

अहिल्यानगर : गावातील पिण्याच्या पाण्याची शुद्धता आता गाव पातळीवरच तपासली जाणार आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला कार्यकर्तीमार्फत ही तपासणी केली जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील १५०० गावातील प्रत्येकी पाच, अशा ७ हजार ५०० महिलांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमात याद्वारे पाणी तपासणीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात आली आहे. याचा अहवालही ऑनलाइन केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे. गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची फिल्ड टेस्ट किटद्वारे (एफटीके) पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी दोन सक्रिय महिलांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या फिल्ड टेस्ट किटद्वारे गावातील पिण्याच्या नळ पाणीपुरवठ्याचे जलस्रोतांसह शाळा, अंगणवाडीमध्ये पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जलस्रोतांचीही तपासणी केली जाणार आहे.

प्रत्येक गावात पाच आशा सेविका, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटाच्या महिला कार्यकर्त्या यांच्यामार्फत ही तपासणी केली जाणार आहे. काही गावात दोन तर काही गावातील तीन, काही ठिकाणी पाच जणींची निवड करण्यात आली आहे. त्यातील प्रत्येक गावातील दोन महिलांना फिल्ड टेस्ट किटचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानंतर उर्वरित तीन महिलांना पाणी तपासणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही माहिती ऑनलाईन पद्धतीने केंद्र सरकारच्या ‘ई-जलशक्ती’ संकेतस्थळावर समाविष्ट केली जाईल.

यापूर्वी ग्रामीण भागात, गाव पातळीवर आरोग्य सेवक व जल संरक्षकांमार्फत पाण्याचे नमुने घेतले जात होते. त्यांच्याकडून ते जिल्हास्तरीय सात व उपविभागीय स्तरावरील सात प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवली जायचे यातील अडचणी दूर करण्यासाठी व व्यापक प्रमाणात नियमित पाणी तपासणीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात आली आहे.

यामाध्यमातून गावातील लोकांचेही पाण्याबाबत प्रबोधन केले जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता रोजच्या जीवनात किती महत्त्वाची आहे, पाणी दूषित होण्याची कारणे कोणती आहेत, अशुद्ध पाणी पिल्याने कोणते परिणाम होतात, पाणी स्वच्छता व आरोग्य यांचा परस्पर संबंध, फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमातून पाणी तपासणीचे महत्त्व, याची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. यामुळे पाण्याच्या गुणवत्तेबाबत दक्षता निर्माण होईल तसेच नागरिकातही जागरूकता निर्माण होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.

Story img Loader