शिखर गाठायचे म्हणजे तपस्या आलीच. एक, दोन वष्रे नव्हे, तर वर्षांनुवष्रे ही तपस्या करावी लागते, तेव्हा कुठे माणूस त्या शिखरावर पोहोचतो. लिखाणाचेही असेच आहे. अलीकडच्या लेखकांना दिवस, महिने, वष्रे अभ्यास करून लिखाण करायला सवड नाही. तसे करून ‘मुद्रा’ निर्माण करण्याची त्यांची तयारी नाही. त्यांना सगळे ‘चायनीज फूड’सारखे ‘फास्ट’ हवे असते. अलीकडचे लिखाण आणि लेखनाविषयी ही खंत व्यक्त करतानाच भविष्यात परिस्थिती बदलेल, असा आशावादही ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. 

लोकसत्ताला दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी लेखक, कवी, कथा, कादंबरी, कविता या साहित्यसंपदेवर भरभरून संवाद साधला. मराठी साहित्यात अजून म्हणावे तसे नवे काही आढळून येत नाही. पूर्वापार चालत आलेले विषय, तीच पद्धत थोडय़ा फार फरकाने अजूनही सुरूच आहे. यात कुठेतरी चांगला, नवा, ताजा बदल व्हायला हवा.
वि.स. खांडेकर जी काही आठ दशके जगले त्यातली सहा दशके त्यांनी लिखाणात घालवली. तब्बल १२५ पुस्तके त्यांनी या सहा दशकात लिहिली. नव्या पिढीला हे जमायला कठीण जात आहे. एक पुस्तक किंवा कादंबरी लिहिली आणि त्याला पुरस्कार मिळाला की, ही मंडळी साहित्य विसरून जातात. त्यांच्यात प्रतिभा आहे. त्या प्रतिभेला साधनेची जोड दिली तर स्वत:ची ओळख ते निर्माण करू शकतात, पण अर्थार्जन ही त्यांची प्राथमिकता असल्याने साधना त्यांच्यासाठी दुय्यम मुद्दा ठरतो. त्याऐवजी मालिकांमध्ये लिखाण करून चिक्कार पैसा कमवण्याची सोपी वाट त्यांनी स्वीकारली आहे.
आयुष्य झपाटय़ाने बदलत असताना त्याचा आढावा घ्यायला तरुणांची मांदियाळी तयार नाही, ही तरुण लेखकांविषयीची भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली.
काव्याचा धागा पकडताना, कवितेची आबाळ पूर्वीपासूनच होत आहे. कथा, कादंबऱ्यांमध्ये कविता दबली गेली आहे. एक मात्र खरे की, जुन्या काळात याच कवितांनी प्रेमाचे धागे अगदी व्यवस्थित गुंफले, अशी मिश्किल वारीही पाटील यांनी या संवादादरम्यान घडवून आणली.

राजकारणाचे व्यापारीकरण
सामाजिक प्रश्नांवर काहीतरी लिखाण करायचा विचार करतो आहे, हे सांगतानाच राजकारणाशी जुळलेले सामाजिक प्रश्नांचे नाते त्यांनी उलगडले. राजकारणाचे व्यापारीकरण होत आहे. घराणेशाही वाढली आहे. इंग्रजांची गुलामगिरी नाकारणारे आपण या राजकीय घराणेशाहीची गुलामगिरी अधिक बळकट करीत आहोत.

मग ‘लातूर’ भूकंपावर कादंबरी का नाही?
गुजरातमधील ‘भूज’वर कादंबरी लिहिली जाऊ शकते, पण ‘लातूर’चा भूकंप त्याहून मोठा असूनही त्यावर साधे लिखाणही केले जात नाही. लिखाणाचा विषय ओळखता आला पाहिजे. विषय चांगला असेल तर चांगल्या पुस्तकाला मरण नाही.

Story img Loader