रिक्त जागांच्या तुलनेत अतिरिक्त शिक्षकांची संख्या अधिक असल्याने विदर्भातील अशा शिक्षकांना मुंबई-नाशिककडे जावे लागण्याच्या आपत्तीस सामोरे जावे लागण्याची चिन्हे असून समायोजन प्रक्रियेतून हे स्पष्ट झाले. सध्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची राज्यव्यापी प्रक्रिया सुरू आहे. शनिवारी रात्रीअखेर एक प्राथमिक चित्र स्पष्ट झाले. राज्यभरात एकूण ७ ते ८ हजार शिक्षक अतिरिक्त ठरत असून तेवढय़ा जागा रिक्त असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, अतिरिक्त शिक्षक व रिक्त जागा समसमान असल्याचे सांगितल्या जात असले तरी विभाग निहाय हे प्रमाण अत्यंत व्यस्त असल्याचेही स्पष्ट होते.
प्राथमिक आकडेवारीनुसार विदर्भातील अकराही जिल्ह्य़ांत नऊशेवर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. मात्र, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची संख्या दीडहजारावर पोहोचते. म्हणजेच सहाशे ते सातशे शिक्षक हे अतिरिक्त ठरत आहे. वर्धेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्य़ात २०७ शिक्षक अतिरिक्त असून रिक्त जागा केवळ ४६ आहेत. याचाच अर्थ उर्वरितांना जिल्हा सोडावा लागेल. तर अमरावती जिल्ह्य़ात रिक्त जागा ३०६ तर अतिरिक्त शिक्षक केवळ १९५ आहेत. अतिरिक्त शिक्षकांच्या तुलनेत रिक्त जागा अधिक असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये वाशीम, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्य़ांचा समावेश होतो. अर्थात अधिकांश जिल्ह्य़ांत अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांचे विदर्भात समायोजन होणे शक्य नाही.
या तुलनेत विदर्भाबाहेर रिक्त जागा असलेल्या जिल्ह्य़ांचे प्रमाण लक्षणीय आहे. एकटय़ा नाशिक जिल्ह्य़ात रिक्त जागा सहाशेवर असून अतिरिक्त शिक्षक केवळ ९२ आहेत. कोल्हापूर ५७०, औरंगाबाद ३४२, जळगाव २६८, उस्मानाबाद ७०, नगर ५०९, पालघर २०७ या जिल्ह्य़ांत रिक्त जागांचे प्रमाण सर्वाधिक आहेत. सांगली जिल्ह्य़ात ३३४ जागा रिक्त असून एकही शिक्षक अतिरिक्त नाही. हिंगोली, रायगड, ठाणे व पुणे येथील प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.
मात्र, शिक्षण विभागाने या संदर्भात प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, सध्या जिल्ह्य़ात समायोजन होऊ न शकणाऱ्या शिक्षकांना पुढील निर्णयापर्यंत त्याच जिल्ह्य़ात ठेवले जाईल, त्यांना वेतनही मिळेल. प्राप्त माहितीनुसार मूळात ही समायोजनाची प्रक्रिया नियमानुसार पूर्ण न झाल्याचा दावा करीत काही संस्थाचालक संघटना न्यायालयात जाण्याच्याही तयारीत आहेत.
विदर्भात रिक्त जागांच्या तुलनेत अतिरिक्त शिक्षक अधिक असण्याच्या पाश्र्वभूमीवर राज्याचे शिक्षण संचालक नामदेव जरग यांना विचारणा केल्यावर ते म्हणाले, विभागनिहाय व्यस्त प्रमाण आहे. पण मुंबई-नाशिक या परिसरात रिक्त जागांची संख्या अधिक असल्याने या जागांवर निश्चितपणे समायोजन होईल.