अशोक तुपे
‘पुस्तके कोणी वाचत नाहीत, वाचन संस्कृती अडचणीत आली आहे,’ अशी ओरड नेहमी केली जाते. पण नेवासे तालुक्यात मात्र यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी टाळेबंदीच्या काळात राबविलेल्या ‘ग्रंथदूत’ उपक्रमामुळे ग्रामीण भागात वाचणाऱ्यांची संख्या वाढली. विशेष म्हणजे पुस्तकांची देवाण-घेवाण सुरू झाली. यातूनच नेवासे तालुक्याची ओळख पुस्तकांचा आणि वाचकांचा तालुका अशी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या प्रेरणेने यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी चार वर्षांपूर्वी ‘गाव तेथे वाचनालय’ उपक्रम सुरू केला. सुमारे ६५ गावांत सार्वजनिक वाचनालये सुरू करण्यात आली. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्यास त्यातून हातभार लागला. पारावर किंवा चावडीवर जमणारी गर्दी हळूहळू वाचनालयात दिसू लागली. टाळेबंदीच्या काळात वाचन संस्कृती वाढविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न गडाख यांनी केला.
करोना विषाणूचा फैलाव झाल्याने टाळेबंदी लागू करण्यात आली. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक अशा सर्वानाच घरी थांबावे लागले. सुरुवातीला दूरदर्शन आणि मोबाइलमध्ये अनेकांनी विरंगुळा शोधला. पण पुढे वेळ कसा घालवायचा, असा अनेकांना प्रश्न पडला. वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून गडाख यांनी यशवंत वाचनालयाच्या माध्यमातून ‘ग्रंथदूत’ ही संकल्पना राबविली. घराघरांत मागणीनुसार हे ग्रंथदूत पुस्तके उपलब्ध करून देत होते. या उपक्रमामुळे तालुक्यातील अनेक गावांत आणि अनेक घरांमध्ये वाचकांची संख्या वाढली. नव्याने वाचणाऱ्यांमध्ये महिला, शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता. विशेष म्हणजे समाजमाध्यमांवरही त्यांनी अनुभव लिहिले.
टाळेबंदीच्या काळात अनेकांनी एकमेकांना पुस्तके भेट दिली. पुस्तक देवान-घेवाणीची एक नवी प्रथा त्यानिमित्ताने सुरू झाली. ग्रंथदूत या संकल्पनेमुळे वाचन संस्कृतीला बळ मिळाले. नेवासे येथे संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला होता. या कक्षातील व्यक्तींना यशवंत प्रतिष्ठानच्यावतीने नियमित पुस्तके दिली जात होती. अनेक नागरिक पुस्तकातील माहिती आवडीने वाचून ती इतरांना सांगू लागली. गावागावांतील पारावर आणि चावडय़ांवरही पुस्तकांचीच चर्चा रंगू लागली. त्यामुळे वाचन संस्कृतीचा प्रसार वाडय़ावस्त्यांवरतीही पोहोचला.
लग्न असो की वाढदिवस पुस्तकांचीच भेट
‘यशवंत सामाजिक प्रतिष्ठान’च्या पुढाकाराने तालुक्यात ग्रंथालये सुरू करण्यात आली आहेत. ग्रंथालयाशी जोडलेले कार्यकर्ते गेल्या चार वर्षांपासून पुस्तक भेटीचा उपक्रम राबवत आहेत. या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला गडाख हेही पुस्तके भेट देतात. अनेक लग्न समारंभात आता पुस्तकांच्या भेटी देणे सुरू झाले आहे. नेवासे तालुका हा उसाचे आगार आहे. उसाच्या फडात ग्रंथवाचनाचा जागर सुरू झाला आहे. आतापर्यंत लाखो रुपये किंमतीची पुस्तके या वाचनालयांमध्ये भेटीतून जमा झाली आहेत.
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने राबवलेल्या ग्रंथदूत संकल्पनेने वाचन संस्कृतीची वृद्धी झाली. टाळेबंदीच्या काळात सुरुवातीला सारे गोंधळून गेले होते. काहीतरी वेगळा उपक्रम करण्याची कल्पना पुढे आली. त्यातून ग्रंथदूत ही संकल्पना सुचली. त्या माध्यमातून घरोघरी पुस्तके पोहोचवता आली. समाजातील सर्व घटकांनी वाचनाचा आनंद घेतला.
– प्रशांत गडाख, अध्यक्ष, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान