प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक विधान केल्याप्रकरणी भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात या वक्तव्याप्रकरणी ३० मे रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार त्यांना २२ जूनला चौकशीसाठी हजर राहाण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. नुपूर शर्मा यांनी केलेल्या विधानानंतर भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मुस्लीम देशांमधून तीव्र पडसाद उमटले होते. भाजपानं नुपूर शर्मा यांना निलंबित केलं असून त्यांच्याविरोधात पोलीस कारवाई सुरू आहे.
प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजपाने प्रवक्तेपदी असणाऱ्या नुपूर शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून दिल्ली भाजपाचे नेते नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही शोदरम्यान हे विधान केलं होतं. त्यावरून भारतातील इतर विरोधकांसोबतच प्रामुख्याने आखाती देशांकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. तसेच, भारतानं जाहीर माफी मागावी, अशी देखील मागणी या देशांकडून करण्यात आली आहे.
या प्रकरणावरून भारतात वातावरण तापलेलं असताना यूएई, मालदीव, सौदी अरेबिया, ओमन, बहारिन, जॉर्डन, लिबिया, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, पाकिस्तान, कतार, कुवैत आणि इराण या देशांकडून निषेध करण्यात आला आहे.