यवतमाळ : नुपूर शर्मां यांचे समर्थन करणाऱ्या येथील एका युवकाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज, गुरुवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.
राजस्थान येथील कन्हैयालाल यांची इस्लामिक कट्टरवाद्यांकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यामुळे शेकडो हिंदू तरुणांनी नुपूर शर्मा यांचे समर्थन केले. त्यानंतर अनेकांना इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहे. अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्याही याच कारणातून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. आता यवतमाळ शहरातील एका युवकाने समाज माध्यमावर नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ मजकूर प्रसारित केल्याने त्याला इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून ठार मारण्याची धमकी मिळाली. दरम्यान, युवकाने याबाबत अवधुतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्याला पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे.