ग्रामीण भागात बिकट स्थिती, सेवेवर ताण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील ग्रामीण भागात सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर सेवा देण्यास फारसे उत्सुक नसताना वैद्यकीय सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या परिचारिकांच्या सेवेवरही रिक्त पदांमुळे ताण पडू लागला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध रुग्णालयांमध्ये परिचारिकांची तब्बल १ हजार १८९ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

‘इंडियन नर्सिग कौन्सिल’ने शहरामध्ये तीन रुग्णांमागे एक परिचारिका आणि ग्रामीण भागात चार रुग्णांसाठी एक असे प्रमाण निश्चित केले आहे, पण त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. काही ठिकाणी तर एका परिचारिकेला एकावेळी २५ ते ३० रुग्णांची सेवा करावी लागते. प्रत्येक तीन रुग्णांमागे एक परिचारिका हे प्रमाण महाराष्ट्र परिचर्या परिषदेनेही मान्य केले आहे. पण, प्रत्यक्षात रुग्णालयांमधील खाटा आणि जमिनीवर ठेवण्यात आलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता हे प्रमाण काही ठिकाणी ४० रुग्ण आणि एक परिचारिका यापेक्षाही जास्त होते, असे एका संशोधनातून आढळून आले आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत परिचारिकांची एकूण ९ हजार ४१८ पदे मंजूर असून ८ हजार २२९ पदे भरलेली आहेत, तर १ हजार १८९ पदे रिक्त आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

राज्यात सुमारे २२ हजार परिचारिका सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये कार्यरत आहेत. पण, रुग्णांची वाढती संख्या पाहता परिचारिकांची संख्या दुप्पट करणे आवश्यक आहे, असे परिचारिकांच्या संघटनेचे म्हणणे आहे.आता सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने शुश्रृषा संवर्गातील रिक्त पदे भरली जात आहेत. तरीही कार्यरत परिचारिकांवर कामाचा ताण जाणवतच आहे. परिचारिकांची रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेडमार्फत पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येत असून रुग्णसेवा सुरळीतपणे चालू राहण्याकरीता परिस्थितीनुसार तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका करण्यात येतात, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

गेल्या वर्षी सरकारी रुग्णालयांमधील परिचारिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एका परिषदेचेही आयोजन केले होते. उच्च शिक्षणासाठी तसेच प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिनियुक्ती तसेच अध्ययन रजा नियमानुसार देण्यात येतात. प्रचलित नियमांनुसार बदली करण्यात येते. चांगल्या सेवा देणाऱ्या परिचारिकांना पुरस्कृतही करण्यात येते. कालबद्ध पद्धतीने पदोन्नती देण्यात येते. सर्व भत्ते दिले जातात, निवासासाठी घरेही दिली जातात, असे सरकारचे म्हणणे आहे.पण, सर्वात बिकट स्थिती ग्रामीण भागात असून सर्वाधिक ताण हा परिचारिकांवर आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. साथीचे आजार बळावतात, तेव्हा तर परिचारिकांसाठी युद्धप्रसंग असतो. अशा स्थितीत रिक्त पदांमुळे रुग्णांना त्याचा फटका सहन करावा लागतो. ग्रामीण भागात सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी शिकाऊ उमेदवार म्हणून  सरकारी रुग्णालयांमध्ये अनेक डॉक्टर सेवा देण्यासाठी येतात, पण त्यात सातत्य नसते,  अशा स्थितीत अनेक रुग्णालयांमध्ये परिचारिकांना रुग्णसेवेसाठी अधिक वेळ द्यावा लागतो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nurses post vacant in maharashtra state