सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचे वातावरण निर्माण होतानाच पावसाळी ढगांनी आकाशात गर्दी केली. त्यामुळे यंदा आंबा पिकाचा हंगाम लांबणीवर पडतानाच आंबा पिकाला धोका पोहचण्याची शक्यता बागायतदाराकडून व्यक्त करण्यात येत आहे. निसर्गाचे ऋतुमान बदलल्याप्रमाणे गेल्या काही वर्षांत पर्यावरणीय बदलाचा फटका बागायतदार शेतकऱ्यांना बसत आहे. दिवाळीच्या हंगामात पावसाळा, उन्हाळा व हिवाळा अनुभवण्याची संधी मागील काही वर्षांप्रमाणे यंदाही मिळत आहे. गेले दोन दिवस थंडीची चाहूल लागली असतानाच पावसाने शिडकावा केला. दमट पावसाळी हवामानामुळे थंडीचा गारठा थोडा कमी जाणवल्याचे सांगण्यात येते. यंदा थंडीच्या आगमनाला उशीर झाल्याने आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता असतानाच पावसानेही बागायतदार शेतकऱ्यांना चिंताग्रस्त करून टाकले आहे.
आंबा व काजू बागायतदार या हवामानातील बदलामुळे चिंतातुर झाले आहेत. निसर्गाने कायमच अवकृपा केल्यास शेती-बागायतीपासून आर्थिक तोटाच सहन करावा लागेल अशी भीती शेतकऱ्यांना वाटते.
यंदा ऑक्टोबपर्यंत पाऊस कोसळल्याने व थंडी लांबल्याने जिल्ह्य़ातील ७० टक्के आंबा कलमांना पालवी फुटली आहे. त्यामुळे हापूस आंबा हंगाम तीन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.
आंबा कलमांना पालवी मोठय़ा प्रमाणात फुटल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोहर उशिरा येणार आहे. बोचऱ्या थंडीची लाटही अद्यापी आली नाही. थंडीची लाटच मोहर घेऊन येणार आहे.
कोकणात १ लाख ६४ हजार हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात ६५ हजार, तर सिंधुदुर्गात ३० हजार हेक्टर भागात आंबा लागवड करण्यात आलेली आहे. कोकणातील बदलत्या हवामानाचा फटका बागायतदार शेतकऱ्यांना कायमच बसत आहे. यंदा सिंधुदुर्गचा आंबा हंगाम लांबण्याबरोबरच निसर्गाच्या बदलत्या वातावरणात सापडला आहे.

Story img Loader