शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारातील मसूरची डाळ अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी शिक्षण संचालकांनी पोषण आहारातील धान्याच्या नमुन्याचे पोषणमूल्य तपासण्याचे आदेश दिले.
जिल्ह्यात १ हजार २६ शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १०० ग्रॅम तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना १५० ग्राम पोषण आहार दिला जातो. अनेक दिवसांपासून पोषण आहाराचा मुद्दा जिल्हाभर गाजत आहे. शिवसेनेचे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी पोषण आहारातील साहित्य निकृष्ट दर्जाचे व कमी वजनाचे येत असल्याबद्दल तक्रार केली होती. या तक्रारीवरून झालेल्या तपासाअंती मसुरची डाळ अत्यंत निकृष्ट दर्जाची व माल कमी वजनाचा मिळत असल्याचे उघडकीस आले आहे.
जिल्ह्याला ११७१ मे. टन पोषण आहाराचे धान्य लागते. शिक्षण विभागाने गेल्या महिन्यात ७५० मे. टन पोषण आहाराच्या मालाची उचल केली होती. पुरवठादाराकडून तांदळाच्या पोत्यात कमी माल येत होता, तर इतर साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्याची दखल घेऊन शाळेवर पुरवठा करण्यात आलेल्या तांदूळ, सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्याचे प्रत्येकी १०० ग्राम नमुने, तसेच तेल, लसुण, कांदा, मसाला, हळद पावडर, मोहरी, जिरे व मीठ या वस्तुंचेदेखील पंचमाने करून नमुने घेण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले होते. शिक्षण संचालकांनी काढलेले आदेश ६ ऑगस्टपर्यंत प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना मिळणे अपेक्षित होते व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल ७ ऑगस्टपर्यंत ई-मेलद्वारे पाठविण्याच्या सूचना दिल्या असताना जिल्ह्यात आतापर्यंत अनेक शाळेच्या मुख्याध्यापकांना शालेय शिक्षण संचालकांनी दिलेल्या आदेशाची माहिती मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात पोषण आहाराच्या वस्तूंचे पंचनामे करून नमुने घेण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे. पोषण आहारात पुरवल्या गेलेल्या  मसुरीची डाळ अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार जिल्हा शिक्षण विभागाने संबंधित विभागाकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा