सामाजिक, आíथक, मानसिक बदलामुळेच महाराष्ट्रात दर ४६व्या मिनिटाला एक शेतकरी आत्महत्या होत आहे. शासकीय पॅकेज देण्याने आत्महत्या थांबणार नाहीत, तर सर्वानी त्याच्या मुळाशी जाऊन विधायक कार्यक्रमांतून शेतकऱ्यांचे मनोधर्य वाढविणे गरजेचे आहे, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी केले.
येथील हॅलो मेडिकल फाऊंडेशन आयोजित ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या एक गंभीर समस्या’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा व चर्चासत्र कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विचारवंत पन्नालाल सुराणा, ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीपती कदम व सतीश बाबर या शेतकऱ्यांच्या हस्ते प्रतीकात्मक गळफासाची होळी करण्यात आली. त्यानंतर पत्रकार दयानंद काळुंके यांनी गीत सादर केले. प्रबोध कांबळे, नागिणी सुरवसे, संध्या रणखांब यांनी शेतकऱ्यांचा भाजीपाला कसा कवडीमोल भावात विकला जातो, यावर नाटक सादर केले. त्यांच्या अभिनयाने जमलेल्या शेतकऱ्यांच्या डोळय़ांत अश्रू जमा झाले. नंतर उपस्थित शेतकऱ्यांना आत्महत्या रोखण्याची शपथ देण्यात आली.
डॉ. पोतदार म्हणाले, की आत्महत्या या तडकाफडकी होत नसतात. त्याच्या पाठीमागे मानसिक आरोग्याचा प्रश्न असतो. शेतकरी कोणाजवळ तरी नकळत आपल्या भावना व्यक्त करतात. परंतु आपण ते थट्टेवर नेतो. आत्महत्येविषयी समाजात मोठय़ा प्रमाणात गरसमज आहेत. जास्तीतजास्त आत्महत्या या पुरुषांच्या होतात याचे सामाजिक कारण म्हणजे त्यांना मन मोकळे करावयास जागाच उरली नाही. त्याचबरोबर हरितक्रांतीचे चुकीच्या पद्धतीने अवलंबन झाल्याने संकरित बियाणे, खते व कीटकनाशके यांचा खर्च वाढत गेला. उत्पादनखर्च जास्त उत्पन्न कमी, अशी अवस्था झाली. त्यामुळे शेतकऱ्यांवर खासगी व सरकारी कर्जाचा डोंगर उभा राहिला. त्यातच हमीभाव नाही, निसर्गाचा लहरीपणा, विभक्त कुटुंबपद्धती यामुळे मदतीचा हात नाही, शेतकरी एकाकी पडला. त्यामुळे जगणे महाग झाले व मरण स्वस्त, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शशिकांत अहंकारी म्हणाले, की या कार्यक्रमात स्वागत-सत्काराला फाटा देऊन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कार्यक्रमांतून जनजागृती करण्यात येणार आहे. यापुढे चार-पाच महिने ग्रामीण भागात जाऊन नाटक, प्रबोधनाद्वारे जनजागृती करणार असल्याचे सांगून शेतकरी संपावर गेल्यास हाहाकार माजेल. त्याने पिकवलेल्या मालाची हमी किंमत तो ठरू शकत नाही. उत्पादित मालाची किंमत ठरवता न येणारा एकमेव घटक म्हणजेच शेतकरी हे दुर्दैव असल्याचे सांगितले. शेतकरी आत्महत्येला जबाबदार सरकार, निसर्ग, जनता की स्वत: शेतकरी या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पन्नालाल सुराणा, अतुल देऊळगावकर, अरिवद घोडके, अप्पासाहेब शेटे आदींसह परिसरातून शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बसवराज नरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. आनंद अहंकारी, गुलाब जाधव यांच्यासह हॅलोच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा