Lakshman Hake : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे, तर या घटनेतील एक आरोपी अद्यापही फरार आहे. या घटनेचा सीआयडीकडून तपास सुरु आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी एसआयटी देखील स्थापन करण्यात आलेली आहे. या प्रकरणात सीआयडीकडून अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. दुसरीकडे दोन कोटींच्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड पोलीस कोठडीत आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी विरोधक करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांचा महासंग्राम सुरु आहे. या घटनेच्या निषेधार्थ परभणी, बीड, पुणे या ठिकाणी मोर्चे देखील निघाले आहेत. या मोर्चात बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे, आमदार सुरेश धस यांच्यासह आदी नेत्यांनी थेटपणे धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं होतं. दरम्यान, यावरून आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी भाष्य करत मनोज जरांगे आणि सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं राजकारण सुरु आहे, मनोज जरांगे आणि सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचं गांभीर्य कमी केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तसेच वाल्मिक कराडला यामध्ये अडकवलं जात असल्याचाही आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा : Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”

लक्ष्मण हाके काय म्हणाले?

“मला प्रश्न विचारायचा आहे की, आम्हाला संजय उर्फ बिट्या गायकवाडच्या आरोपीचा शोध तुम्ही लावून द्या. भटक्या विमुक्ताच्या मुलाची हत्या झाली तर त्याविरोधात मोर्चे निघत नाहीत. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. आता संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण केलं जात आहे. एका समाजाच्या विरोधात गरळ ओकण्याचं काम सुरु आहे. काही तरुणांना तुम्ही टार्गेट करण्याचं काम करत आहात. पण या सर्व गोष्टींचं उत्तर तुम्हाला द्यावा लागेल. एखादा व्यक्ती आमदार किंवा खासदार झाल्यानंतर ते सर्वांचे आमदार, खासदार असतात. पण संतोष देशमुख यांच्या श्रद्धाजली सभेत तुम्ही राजकीय नेत्यांना टार्गेट करता. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचं गांभीर्य सुरेश धस आणि मनोज जरांगेंनी कमी केलं”, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

“महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. पण उठलं की सुरेश धस टिव्हीवर असतात. मी या हत्येच्या घटनेचं समर्थन करत नाही. पण गावगाड्यातील ओबीसींचा आवाज असलेले पंकजा मुंडे असो किंवा धनंजय मुंडे असो किंवा छगन भुजबळ असोत. आमचे प्रश्न सोडवणाऱ्यांना माणसांना गुन्हेगार कसं म्हणता? त्यांच्या विरोधातले पुरावे कुठे आहेत? आता तुमची माणसं निवडून आणण्यासाठी वाल्मिक कराड चालतात. राष्ट्रवादी पक्ष संघटना वाढवण्यासाठी वाल्मिक कराड चालतात. मग अचानक तुम्हाला धनंजय मुंडे दिसतात? मला वाटतं की त्यांना ( वाल्मिक कराड यांना) अडकवलं जातंय”, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.

“महाराष्ट्रातील ओबीसींमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी या गोष्टी होत आहेत का? पण ओबीसींना आता एकत्र यावं लागेल. सीआयडीमधील अधिकाऱ्यांनाही हे म्हणतात की या जातीच्या अधिकाऱ्याला बाहेर काढा, त्या अधिकाऱ्याला बाहेर काढा. मग आता आम्हीही असंच म्हणायचं का? जर एखाद्या अधिकाऱ्याला त्याची जात काढून बाहेर काढलं जात असेल तर मग आम्ही कोणाची जात काढायची? आम्ही तुमची जात काढायची का?”, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obc leader lakshman hake on manoj jarange patil and mla suresh dhas and santosh deshmukh case beed politics gkt